पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेनमधील संघर्षाने संपूर्ण जगाची चिंता वाढली असतानाच आता रशियन लष्कर दोन पावलं मागे आले आहे. युक्रेनमधील खेरसन शहरातून लष्काराने माघार घ्यावी, असा आदेश रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी दिला आहे. ( Russia abandons Kherson ) रशियाने खेरसन येथे नियुक्त किरील सट्रेमोसोव्ही यांचे कार अपघातात निधन झाले. यानंतर अवघ्या काही तासांमध्येच ही घोषणा करण्यात आली. रशिया-युक्रेन युद्धातील गेल्या ९ महिन्यांमधील हे एक महत्त्वाचे वळण मानले जात असली तरी युक्रेनच्या वतीने यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यावेळी खेरसन शहर रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. नुकतेच वृत्तवाहिन्यांशी बोलताना रशियाचे जनरल सर्गेई सुरोविकिन यांनी म्हटलं होते की, आम्हाला खेरसन शहरात असणाऱ्या सैनिकांना पुरवठा करणे आता शक्य नाही. तसेच येथील रशियन सैनिकांचे प्राण वाचवणे याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही असे निर्णय घेणार आहोत ज्यामुळे आपली लष्करी युनिटची क्षमता अबाधित राहिल. त्यामुळे आता खेरसनमध्ये सैनिक ठेवणे व्यर्थ ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
काही दिवसांपूर्वी रशियाचे लष्कराने खेरसन शहराला जोडणारा मुख्य पूल उडविला होता. याचे छायाचित्र रॉयटर्स वृत्तसंस्थने दिले होते. यानंतर आता संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी खेरसनमधून सैन्याला माघारी येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्षावर आता लवकरच तोडगा निघेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
युक्रेनमधील खेरसन शहरातून लष्काराने माघार घ्यावी, असे आदेश रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी दिले आहेत. मात्र या आदेशावर युक्रेनने सावध प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांचे सल्लागार माईखाइयो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे की, "रशियाचे सैन्य अद्यापही खेरसनमध्येच आहे. जोपर्यंत खेरसन शहरावर युक्रेनचा ध्वज फडकत नाही तोपर्यंत रशियन सैन्यानी शहरातून माघार घेतली, असे म्हणणे खूप घाईगडबडीचे होईल."