Latest

सनातन धर्माला कोणत्‍याही प्रमाणपत्राची गरज नाही : सरसंघचालक मोहन भागवत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सनातन धर्म फार पूर्वीपासून होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आपण आपल्या आचरणाने लोकांना 'सनातन' समजले पाहिजे. सनातन धर्म काळाच्या कसोटीवर उतरला असल्याने त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रतिपादन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज ( दि. ३० ) केले. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 'संन्यास दीक्षा' कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी ऋषीग्राम येथे 'पतंजली संन्यासा'तील संन्यास उत्सवाच्या आठव्या दिवशी चतुर्वेद पारायण यज्ञ केला. यानंतर बोलताना मोहन भागवत म्‍हणाले की, "आज तुम्ही भगवा रंग परिधान करून सनातन धर्माची प्रतिष्ठा वाढवण्याची शपथ घेत आहात. जो 'सनातन' आहे त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. बाकी सर्व काही बदलते. मात्र सनातन धर्म आजही आहे आणि उद्याही राहील. आपण आपल्या आचरणाने लोकांना 'सनातन' समजले पाहिजे."

यावेळी योगगुरु स्वामी रामदेव म्हणाले की, "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पतंजली महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि स्वदेशी शिक्षण व्यवस्थेतील सर्व क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करत आहे. देश स्वतंत्र झाला आहे; पण शिक्षण आणि वैद्यकीय व्यवस्था स्वत:ची नाही. गुलामगिरीचे कर्मकांड आणि प्रतीके नष्ट करावी लागतील. हे काम फक्त संन्यासीच करू शकतात."

रामनवमीनिमित्त स्वामी रामदेव दीडशे तरुणांना दीक्षा देऊन 'प्रतिष्ठान संन्यास' सुरू करणार आहेत. पतंजली विद्यापीठाच्या नव्या  इमारतीचे उद्घाटनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT