Latest

आरआरआर चित्रपटाचे १०० कोटींचे नुकसान; ‘राधे श्याम’चे प्रदर्शन ढकलले पुढे

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बहुप्रतीक्षित आरआरआर चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलली गेली. हा चित्रपट 7 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता नवीन डेट अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटाची रीलिज टळल्याने चित्रपटाचे सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.

आत्तापर्यंत आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 20 कोटी रुपये खर्च केले होते, तेही वाया गेले असून परदेशातील अ‍ॅडव्हान्स बुकिंगपोटी जमा झालेले 10 कोटी रुपयेही आता परत द्यावे लागणार आहेत. नवीन रीलिज डेट आल्यावरही प्रमोशन करावे लागेल ते वेगळे. कारण तेव्हाही प्रमोशनसाठी खर्च करावा लागेल. शिवाय या चित्रपटाच्या रीलिजला आता जितका उशीर होईल, तितके याचे नुकसान होणार आहे. कारण चित्रपटाचे बजेट 400 ते 500 कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपटाला फायनान्स करणार्‍यांचे व्याज वाढतच जाणार आहे.

आंध्र प्रदेशात निर्माते आणि राज्य सरकार यांच्यात तिकीट दराच्या मुद्द्यावरून वाद आहे. राज्य सरकारने तिकीट दराची मर्यादा निश्‍चित केली आहे. कमी तिकीट दरांमुळे वितरकांनी निर्मात्यांनी ठरलेल्या करारात कपात करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आंध्रातून वितरकांकडून निर्मात्यांना जवळापस 50 कोटी रुपये कमी मिळणार आहेत. याशिवाय आता पुढील काळात आरआरआर चित्रपटाला सोलो रन मिळणे म्हणजे कुठल्याही चित्रपटाशी स्पर्धा न होता चित्रपट रीलिज करण्याची संधी मिळणे दुरापास्त असू शकते. कारण यापूर्वीच 'आरआरआर'साठी 'गंगूबाई काठियावाडी' पुढे ढकलला गेला होता. तथापि, या चित्रपटाने वितरण आणि इतर हक्‍कांतून यापूर्वीच 900 कोटींची कमाई केली आहे.

'राधे श्याम'चे प्रदर्शन पुढे ढकलले

अक्षयकुमारच्या 'पृथ्वीराज'पाठोपाठ आता प्रभास आणि पूजा हेगडे यांचा बहुचर्चित 'राधे श्याम' या चित्रपटाची रीलिज डेटही आता पुढे ढकलण्यात आली आहे. 'आरआरआर' पोस्टपोन झाल्याच्या घोषणेनंतर आता हे दोन चित्रपटही पुढे ढकलले गेले आहेत. तथापि, हा चित्रपट ओटीटीवर नाही तर थिएटर्समध्ये रीलिज करण्याचा निर्मार्त्यांचा निर्धार आहे. याची नवी रीलिज डेट लवकरच घोषित केली जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT