Latest

उद्धव-फडणवीस यांच्यात खणाखणी

Arun Patil

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना केलेल्या मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मारहाण होऊनही गुन्हा दाखल का नाही, असा सवाल करून हे मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. याचवेळी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. कार्यकर्त्यांवर शिंदेंच्या गुंडांकडून हल्ला होऊनही ते गप्प आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवढ्याच तिखटपणे प्रत्युत्तर देत 'कोण फडतूस हे अडीच वर्षांत दिसले', असा पलटवार केला आहे.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रोशनी शिंदे यांना शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे नोकरी करीत असलेल्या ठिकाणी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. मात्र, शिवसेना पदाधिकार्‍यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. रोशनी शिंदे या चरई येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

आपल्या कार्यकर्तीला मारहाण झाली हे समजताच ठाकरे कुटुंबीयांसह दुपारी ठाण्यात दाखल झाले. यावेळी प्रथम ते पोलिस आयुक्त कार्यालयात भेटीसाठी गेले होते. तथापि, पोलिस आयुक्त घोडबंदर येथे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर चिडलेल्या उद्धव ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिस आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी केली. त्याचबरोबर राज्यात मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री आहेत, असा बोचरा सवाल करत गृहमंत्र्यांवरही निशाणा साधला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार राजन विचारे, खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. महिला मारहाणीचा निषेध करत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

फडतूस कोण हे अडीच वर्षांत दिसले : फडणवीसांचा पलटवार

राज्यात फडतूस कोण हे अडीच वर्षांच्या कारभारात दिसले. त्यामुळे मी वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर मी राजीनामा देणार नाही. मारहाणीची घटना काय आहे हे तपासले जाईल, असेही ते म्हणाले. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी खरपूस टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

महिलेच्या पदराआडून वार : नरेश म्हस्के

ठाकरे गटाकडून महिलांच्या पदराआड दडून जे आरोप होत आहेत, ते तथ्यहीन आहेत. आमच्या महिला कार्यकर्त्यांनी कोणालाही मारहाण केलेली नाही. या महिलेला कुठेही दुखापत झालेली नाही, असा वैद्यकीय अधिकार्‍यांचा अहवाल आहे. त्यामुळे हे सर्व आरोप तथ्यहीन आहेत, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

रोशनी शिंदे या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत. रविवारी शिवसेनेचे दत्ताराम गवस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टाकलेल्या पोस्टला उत्तर देताना रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचे नाव घेऊन आक्षेपार्ह पोस्ट केली आणि तेथून वादाला सुरुवात झाली. याचा जाब शिंदे गटाच्या महिलांनी विचारल्यानंतर त्यांनी माफी मागितली. तथापि, त्या माफीमधील शब्द न पटल्याने काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.

…आणि वादाला तोंड फुटले

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीच्या नावे पोस्ट व्हायरल केली म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर शिवसेना महिला आघाडीच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी कासारवडवली येथील कामाच्या ठिकाणी जाऊन मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. दरम्यान, मारहाण झालेल्या कार्यकर्तीला चक्कर येऊन उलट्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT