Latest

Rohit Sharma Record : 250 सामने जिंकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू, जाणून घ्या आकडेवारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : भारतीय संघाने तिसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानवर डबल सुपर ओव्हरद्वारे रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 250 सामने जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

रोहितच्या टी-20 क्रिकेटमधील विजयाची आकडेवारी

रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 426 सामने खेळले असून त्यातील 250 सामने जिंकले आहेत. त्याने आतापर्यंत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी 101 जिंकले आहेत. तो 100 सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या बाबतीत इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅट (111) ही आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि देशांतर्गत टी-20 क्रिकेटधील मिळून 149 सामन्यांत रोहितने विजय मिळवला आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीयमधील रोहितच्या कर्णधारपदाची आकडेवारी

रोहितने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 53 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्यातील 41 सामने जिंकले असून 12 लढती गमावल्या आहेत. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीने 72 पैकी 42 जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत टाय झाला होता, जो बॉल आऊटमध्ये जिंकला होता. त्यामुळे तो सामना थेट जिंकण्याच्या यादीत जमा धरता येत नाही. त्याचप्रमाणे रोहितच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही बरोबरीत सुटल्याने सरळ विजय मिळवता आला नाही. या सामन्याचा निकाल डबल सुपर ओव्हरमध्ये लागला.

कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 धावा

तिसर्‍या टी-20 मध्ये रोहितने 44 वी घेताच नवा टप्पा गाठला. त्याने कोहलीचा मोठा विक्रम मोडला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1,648 धावा करणारा भारतीय कर्णधार बनला. कोहलीने 50 टी-20 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून 47.57 च्या सरासरीने 1,570 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित या बाबतीत अॅरॉन फिंच, बाबर आझम आणि केन विल्यमसनच्या मागे आहे.

रोहितची खेळी झंझावाती खेळी

रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिस-या टी-20 सामन्यात 69 चेंडूंचा सामना करत 121 धावा तडकावल्या. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 175.36 राहिला. हिटमॅनने रिंकू सिंह (69) सोबत 190 धावांची भागीदारी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय जोडीची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्द

रोहितने आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 151 टी-20 सामन्यांच्या 143 डावांमध्ये 31.29 च्या सरासरीने आणि 139.92 च्या स्ट्राइक रेटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3,974 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 5 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 121 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

SCROLL FOR NEXT