पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात रोहित शर्माला फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्माने 27 चेंडूत 24 धावांची खेळी केली. रोहितसह यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रोहित शर्माने 468 सामन्यांमध्ये 18,444 धावा केल्या आहेत, तर सौरव गांगुलीच्या नावावर 421 सामन्यांत 18,433 धावा आहेत. भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 सामन्यांमध्ये 34,357 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 100 शतके आणि 164 अर्धशतके आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 522 सामन्यांमध्ये 26,733 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर 80 शतके आणि 139 अर्धशतके आहेत. (Rohit Sharma Record as captain)
1. सचिन तेंडुलकर : 664 सामने : 34,357 धावा
2. विराट कोहली सामने : 522 सामने : 26,733 धावा
3. राहुल द्रविड : 504 सामने : 24,064 धावा
4. रोहित शर्मा : 468* सामने : 18,444
5. सौरव गांगुली सामने : 421 : 18,433 धावा