Latest

Australian Open 2024 Men’s Doubles Final : रोहन बोपण्‍णा-मॅथ्यू एबडेनची ‘ऑस्ट्रेलियन ओपन’वर मोहोर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील टेनिसप्रेमींसाठी लक्षवेधी ठरलेल्‍या यंदाच्‍या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्‍या अंतिम सामन्‍यात भारताच्‍या रोहन बोपण्‍णा आणि ऑस्‍ट्रेलियाच्‍या मॅथ्‍यू एबडेन यांनी बाजी मारली. त्‍यांनी इटलीच्‍या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वाव्हासोरी या जोडीचा ७-६ (७-०), ७-५ असा पराभव केला. ( Australian Open 2024 men's doubles final ) या ऐतिहासिक कामगिरीमुळे रोहन बोपण्‍णा हा ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धा जिंकणारा सर्वात वयस्‍क अग्रनामांकित टेनिसपटू ठरला आहे. त्‍याचे कारकीर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्‍याने यापूर्वी २०१७ मध्‍ये फ्रेंच ओपन स्‍पर्धेत मिश्र दुहेरी स्‍पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

पहिल्‍या सेटमध्‍ये रोहन आणि मॅथ्‍यूचे निर्विवाद वर्चस्व

पहिल्या सेटच्या पहिल्या गेममध्ये सलग पॉईंट घेत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन जोडीने दमदार सुरुवात केली; पण सिमोन बोलेली आणि अँड्रिया वाव्हासोरी जोडीनेही दमदार खेळीचे प्रदर्शन केला. यामुळे पहिल्या सेटमध्‍ये  ३-३ अशी बरोबर झाली. त्यानंतर चौथा गेम जिंकून बोपण्णा-एबडेन जोडीने ४-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा बोलेली-वाव्हासोरी जोडीने सलग पॉईंट मिळवत ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर बोपण्णा- एबडेन जोडीने ५-४ अशी आघाडी घेतली. पण पुन्हा ५-५ अशी बरोबरी झाली. पहिल्या सेटमध्ये सावध खेळाचा पवित्रा घेत दोन्ही जोड्यांनी सर्व्हिस कायम राखण्याचा प्रयत्न केला. राेहन बाेपण्‍णा याने आपला जाेडीदार मॅथ्यूच्‍या उणीवा कमी करण्‍याचा प्रयत्‍न करत सामन्‍यातील पकड कायम ठेवली. पहिल्या सेटमध्ये ६-६ बरोबरी साधल्यानंतर सेट ट्रायब्रेकरमध्ये गेला. ट्रायब्रेकरमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत राेहन- मॅथ्यू जोडीने सलग ७ पॉईंट घेत सेट आपल्या नावावर केला. त्यांनी पहिला सेट ७-६ (७-०) असा जिंकला.

दुसर्‍या सेटमध्‍येही राेहन-मॅथ्‍यूचा दबदबा कायम

दुसर्‍या सेटमध्‍ये राेहन-एबडेन आणि सिमोन-अँड्रिया यांनी उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत आपली सर्व्हिस कायम राखत सामन्‍यात ५-५अशी बराेबरी साधली. सहाव्‍या गेममध्‍ये राेहन आणि एबडेन यांनी  सिमोन-अँड्रिया यांची सर्व्हिस ब्रेक करत दुसर्‍या सेटमध्‍ये 6-5 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसरा सेट  7-5 असा नावावर केला.

रोहनने वयाच्या ४३ व्या वर्षी रचला इतिहास, पुरुष दुहेरीत नंबर-१

ऑस्ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत रोहन बोपण्णा याने वयाच्या ४३ व्या वर्षी बुधवारी (२४ जानेवारी) इतिहास रचला होता. जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरी गाठली हाेती. त्‍यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचा ६-४, ७-६ (७-५) असा पराभव केला हाेता. या विजयामुळे राेहन बोपन्ना टेनिस पुरुष दुहेरीत जगातील नंबर १ टेनिसपटू बनला हाेता. विशेष म्हणजे वयाच्या ४४ व्या वर्षी तो पहिल्यांदाच टॉपवर पोहोचला. अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्क खेळाडू ताे ठरला. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन यांनी चीनच्या बिगरमानांकित झांग झिझेन आणि चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचक यांचा 6-3, 3-6, 7-6 (10-7) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता रोहन बोपण्‍णा हा  ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धा जिंकणारा सर्वात वयस्‍क अग्रनामांकित टेनिसपटू ठरला आहे.

रोहन एका योद्धासारखा लढला : मॅथ्यू एबडेन

रोहन ४३ वर्षांचा आहे. तो या स्‍पर्धेत एका योद्धासारखा लढला. तुम्‍ही मनाने तरुण असणे आवश्‍यक आहे. मग वय हे केवळ आकडीवारी ठरते असे रोहनचा जोडीदार मॅथ्यू एबडेन याने सांगितले.

सर्वांचे आभार, पुढील वर्षीही पुन्‍हा खेळण्‍यासाठी येईन

सर्वप्रथम मी सिमोन बोलेली आणि अँड्रिया वाव्हासोरी यांचे अभिनंदन करतो. त्‍यांनी उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. माझ्‍यासाठी वयाने फरक पडत नाही. चाहत्‍यांचा पाठिंबा हेच मला खेळण्‍याची उर्जा देते. माझा जोडीदार मॅथ्यू एबडेन याने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. मी सर्वांचे आभार मानतो. त्‍याचबरोबर माझी पत्‍नी आणि मुलीचे विशेष आभार मानतो. मी पुढील वर्षी पुन्‍हा ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी येईन, अशा शब्‍दांमध्‍ये रोहनने आपला ग्रँडस्‍लॅम विजय साजरा केला.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT