Latest

Roger Federer Retirement : फेडररचा चाहत्यांना ‘दे धक्का’! अचानक जाहीर केली निवृत्ती

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. 41 वर्षीय फेडररने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून टेनिस कोर्टका बाय-बाय करत असल्याचे जाहीर केले. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये फेडरर अखेरचा खेळताना दिसणार आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत फेडरर संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. राफेल नदालने 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. 2021 च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर शेवटचा खेळताना दिसला होता. तो गेली 3 वर्षे सतत दुखापतीशी झुंज देत आहे. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामागे दुखापत हे एक मोठे कारण असू शकते, अशी चर्चा आहे.

फेडरर बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता आणि शस्त्रक्रियेनंतर तो पुनरागमन करू शकला नाही. 41 वर्षीय महान खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर टेनिसचे एक युग संपल्याचे मानले जात आहे. फेडररने आपल्या खेळाने अनेक सुवर्ण क्षण संपूर्ण जगाला दाखवले आहेत. ट्विटरवर तो म्हणाला की, 'मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले. टेनिस माझ्याशी इतक्या उदारतेने वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि आता मला हे ओळखावे लागेल की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे.'

फेडररने त्याची पत्नी मिर्काचेही आभार मानले आहेत. पत्नीबद्दल भावनिक होऊन तो म्हणतो की, 'फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले, त्यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर असतानाही तिने खूप सामने पाहिले आणि 20 वर्षांहून अधिक काळ ती माझ्यासोबत आहे.'

रॉजर फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले. विजेतेपदाच्या लढतीत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.

SCROLL FOR NEXT