Latest

‘ओमायक्रॉन’च्या उत्पत्तीसाठी कुरतडणारे जीव जबाबदार

Arun Patil

नवी दिल्ली : 'कोव्हिड-19' महामारीच्या दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस 'सार्स-कोव्ह-2' या कोव्हिड-19 आजाराला जबाबदार मूळ कोरोना विषाणूचे 'ओमायक्रॉन' हे नवे रूप पाहायला मिळाले. हे नवे रूप वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांसाठी आव्हान बनून आले. 26 नोव्हेंबर 2021 ला जागतिक आरोग्य संघटनेने त्याला चिंताजनक विषाणू ठरवले होते. आता एका नव्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी म्हटले आहे की ओमायक्रॉन हा कोरोना विषाणू उंदीर, खार, ससे अशा कृदन्त वर्गातील (रोडन्टस्) म्हणजेच वस्तू कुरतडणार्‍या प्राण्यांमधून विकसित झालेला असावा.

'कोव्हिड-19' महामारीच्या दुसर्‍या वर्षात 'सार्स-कोव्ह-2' विषाणूत इतके बदल कसे झाले याची पडताळणी आता संशोधक करीत आहेत. रिव्हर्स जूनोसिस, कृदन्त वर्गातील फैलाव आणि नंतर जूनोसिसच्या रूपात फैलावल्यानंतर संभवतः ओमायक्रॉन व्हायरसच्या चिंताजनक स्वरूपाचा विकास झाला असावा. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, थिरुमलाई मिशन हॉस्पिटल, रानीपेट, तामिळनाडू तसेच नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

आधीच्या संशोधनांमध्ये असे आढळले होते की 'सार्स-कोव्ह-2' विषाणूचे ओमायक्रॉन संस्करण प्राण्यांमधून माणसात संक्रमित झाले असावे. 'सार्स-कोव्ह-2'ने संक्रमित कमजोर रोगप्रतिकारक क्षमतेच्या व्यक्तींमध्ये होणार्‍या उत्परिवर्तनापेक्षा प्राण्यांमधील रिव्हर्स जूनोसिसचे कारण संशोधकांना अधिक वाटते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'करंट सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT