Latest

Road Crossing : ‘या’ ठिकाणी एकाच वेळी 3 हजार लोक ओलांडतात रस्ता

अनुराधा कोरवी

टोकियो : गजबजलेल्या, रहदारीच्या ठिकाणी रस्ता ओलांडणे म्हणजे जणू काही तारेवरची कसरतच असते. अनेकदा सज्ञान व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना गोंधळून जायला होते. मात्र काही ठिकाणी हे अगदी सवयीचे झाल्याप्रमाणे लोक सहज रस्ता ओलांडताना दिसतात. ( Road Crossing ) जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये एक जगप्रसिद्ध चौक आहे. या चौकाचे नाव 'शिबुया क्रॉसिंग' असे आहे. या चौकाला 'शिबुया स्कॅम्बल क्रॉसिंग' असेही म्हणतात.

 'शिबुया स्कॅम्बल क्रॉसिंग' चौकाचे वैशिष्ट्य म्हणजे रस्ता ओलांडणार्‍यांच्या संख्येचा विचार केला तर हा जगातील सर्वाधिक गजबजलेला चौक आहे. एकदा सिग्नल लागल्यावर सर्व बाजूचे लोक हा रस्ता ओलांडतात. हा रस्ता ओलांडताना एकाच वेळेस 3 हजार लोक रस्त्याच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला जातात. आता चालणार्‍यांची संख्या वाचून तुम्हाला या बाता वाटत असतील तर या दाव्याला समर्थन करणारा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला हा रस्ता किती गजबजलेला आहे याचा अंदाज बांधता येईल.

'सीएन ट्रॅव्हल'ने दिलेल्या माहितीनुसार, हा चौक शिबुया स्थानकासमोर आहे त्यावरून त्याला 'शिबुया क्रॉसिंग' असे नाव पडलं आहे. 'शिबुया स्क्रॅम्बल' असे टोपणनाव या चौकाला देण्यात आले आहे. या चौकामध्ये दर 80 सेकंदांनंतर वाहने सिग्नलमुळे थांबतात.

सिग्नल लागल्यानंतर अगदी कमी गर्दीच्या वेळेही किमान 1 हजार तर गर्दीच्या वेळेस 3 हजार लोक रस्ता ओलांडतात. त्यामुळेच या चौकाला जगातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून ओळखले जाते. या चौकामध्ये कायमच लोकांची गर्दी असते असे अनेकजण सांगतात. एक्सवरून (आधीच टि्वटर) या चौकाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 8 सेकंदांच्या या व्हिडीओला कॅप्शन देताना, 'टोकियोमधील शबुया क्रॉसिंग जगात एकाच वेळेस सर्वाधिक लोक पायी चालत रस्ता ओलांडतात असा चौक आहे.

एका वेळेस या ठिकाणी 3000 लोक रस्ता क्रॉस करतात,' असे म्हटले आहे. या व्हिडीओला मागील काही दिवसांमध्ये 1.8 मिलियन व्ह्यूज आहेत. 2 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ रिशेअर करण्यात आला आहे. 'सालसा वर्ल्ड ट्रॅव्हलर'च्या अहवालानुसार,'शिबुया क्रॉसिंग'वर 10 रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. वेगवेगळ्या रस्त्यांवरून येणारे लोक सिग्नलची वाट पाहत उभे असतात. मग सिग्नल लागल्यावर एकाच वेळी रस्ता ओलांडतात. शिबुया क्रॉसिंग परिसरामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्दळ अधिक असते. ( Road Crossing )

SCROLL FOR NEXT