Latest

Heard Sunlight : कडक सूर्यप्रकाशामुळे विषबाधेचा धोका

Arun Patil

उन्हाळा सुरू झाला आहे. कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न आणि टॅनिंगची समस्या खूप सामान्य आहे; पण सूर्यप्रकाशामुळे सन पॉयझनिंगदेखील होऊ शकते. सनबर्न आणि सन पॉयझनिंग हे एकच आहे, असे अनेकांना वाटते; परंतु सन पॉयझनिंग हे सनबर्नपेक्षा जास्त धोकादायक आहे.

सन पॉयझनिंग हा सनबर्नचा घातक प्रकार आहे. आपण सूर्याच्या पॅराव्हायोलेट किरणांच्या संपर्कात बराच काळ असतो तेव्हा असे होते. ही समस्या दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्वचेची जळजळ सुरू होते आणि खवले तयार होऊ लागतात. त्वचा लालसर होणे, वेदना होणे, त्वचेची खपली निघून फोड येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अतिसार होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, मळमळ किंवा उलट्या होणे, भोवळ येणे, सन पॉयझनिंग वाढल्यास पू किंवा पाणी येणे ही सन पॉयझिंगची लक्षणे आहेत. यामुळे काही दिवसांतच वेदना वाढून सूज येऊ लागते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् निघून जातात, तेव्हा गंभीर लक्षणे दिसू लागतात.

पॉयझनिंगपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशन वापरावे. संपूर्ण त्वचा झाकल्यानंतरच घराबाहेर पडावे, बाहेर जाताना सुती कपडे घालावेत आणि घट्ट कपडे घालणे टाळावे, असे सांगितले जाते. बाहेर फिरताना गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे. टोपी किंवा कापडाने डोके झाकावे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत घराबाहेर जाण्याचे टाळावे. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा, असेही सांगितले जाते. खूप घाम येत असेल, तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावे.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण, योग्य काळजी न घेतल्यास उन्हाळ्यात त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनते. कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अ‍ॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणे, मॉईश्चरायझिंग न करणे, भरपूर मेकअप करणे, स्वत:ला हायड्रेट न ठेवणे या चुका उन्हाळ्यात करू नयेत, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

डॉ. दत्तात्रय मुळे

SCROLL FOR NEXT