पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या माध्यमातून योग्य कार्य करत आहेत, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. रशिया आपल्या देशांतर्गत उद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी भारताचे अनुकरण करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
व्लादिवोस्तोक येथे एका कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले की, रशियामध्ये पूर्वी देशांतर्गत कार निर्मिती केली जात नव्हती;पण आज रशिया कारची निर्मिती करतो. आम्ही ९०च्या दशकात मो्या प्रमाणावर विदेशातून कार खेरदी केल्या. परंतु आपल्यासमोर ही समस्या नाही. आपण आपल्या अनेक भागीदारांचे अनुकरण केले पाहिजे. उदारहणार्थ भारत. भारतीय बनावटीच्या वाहनांच्या निर्मितीवर आणि वापरावर लक्ष केंद्रित करतात. मला वाटते की, मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य कार्य करत आहेत. ते बरोबर आहेत." .
आमच्याकडे रशियन बनावटीच्या मोटारगाड्या आहेत. त्या आपण वापरल्या पाहिजेत. यामुळे आमच्या WTO दायित्वांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही. आपण एक विशिष्ट साखळी तयार केली पाहिजे. या माध्यमातून वेगवेगळ्या श्रेणीचे अधिकारी देशांतर्गत बनवलेल्या कार वापरतील, असेही पुतिन म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी, बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि उत्कृष्ट उत्पादनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 'मेक इन इंडिया' मोहीम सुरू केली होती. हा उपक्रम चार स्तंभांवर आधारित आहे, ज्यांना केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रांमध्येही भारतातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी ओळखण्यात आले आहे.
'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) कोणत्याही प्रकारे रशियाला प्रभावित करणार नाही. किंबहुना त्याचा देशाला फायदाच होईल, असा विश्वासही पुतिन यांनी विश्वास व्यक्त केला.