Latest

Uber कडून पुन्हा नोकरकपात, एवढ्या कर्मचाऱ्यांना नारळ

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक राइड-शेअरिंग कंपनी उबेरने बुधवारी त्यांच्या भरती विभागातील २०० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. ही नोकरकपात संपूर्ण वर्षभर कर्मचारी संख्येत समतोल राखण्याच्या Uber च्या धोरणाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कठीण आर्थिक परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी कंपनीने नोकरकपात केली आहे.

ही नोकरकपात Uber च्या जागतिक स्तरावरील कर्मचार्‍यांपैकी १ टक्क्यांहून कमी आहे. उबेरचे जागतिक स्तरावर ३२,७०० कर्मचारी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीने त्यांच्या मालवाहतूक सेवा विभागातील १५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता पुन्हा २०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अलीकडील काही दिवसांतील ही नोकरकपात Uber च्या भरती विभागाच्या अंदाजे ३५ टक्के आहेत. खर्च कमी करण्याच्या उद्देशाने उबेरने हा निर्णय घेतला आहे. उबरने यापूर्वी २०२० मध्ये कोरोना काळात कर्मचार्‍यांची संख्या १७ टक्क्यांनी कमी केली होती.

उबेरची प्रमुख प्रतिस्पर्धी राइड-शेअरिंग कंपनी Lyft च्या तुलनेत Uber ने अलिकडच्या काही महिन्यांत कमी प्रमाणात नोकरकपात केली आहे. नवीन सीईओ डेव्हिड रिशर यांच्या नेतृत्वाखाली लिफ्टने एप्रिलमध्ये मोठी नोकरकपात केली होती. ही कपात एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे २६ टक्के इतकी होती.

याव्यतिरिक्त, कंपनीने गेल्या वर्षीच्या अखेरीस सुमारे ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. नफ्याचे गणित लक्षात घेऊन तसेच मोठा स्पर्धक उबेरच्या तुलनेत बाजारपेठेतील त्यांचे स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात Lyft ने मनुष्यबळ कमी केले होते.

मे महिन्यात Uber ने ऑपरेटिंग उत्पन्न नफा वाढविण्याची अपेक्षा जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर उबेरने नोकरकपात सुरु केली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT