Latest

३२३ वर्षांपूर्वी १ ऑक्‍टोबरला माण नदीत मोडला होता औरंगजेबाचा पाय : आलमगीर झाला लंगडा

Arun Patil

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी साम्राज्य जिंकण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात आलेल्या मुघलसम्राट औरंगजेबाला ते उभ्या हयातीत साध्य झाले नाही; पण त्याच्या नादात औरंगजेबाने अक्षरश: तंगड्या तोडून घेतल्या होत्या. माणदेशातील माणगंगेेने या आलमगिराला जन्माची अद्दल घडवून आयुष्यभर लंगडा करून सोडले. 323 वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी 1 ऑक्टोबर 1700 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील खवासपूर गावी घडलेल्या त्या ऐतिहासिक घटनेची ही एक रोमांचकारी आठवण…

3 एप्रिल 1680 रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे देहावसान झाले आणि अनेकवेळा मराठा फौजेकडून सपाटून मार खाल्लेल्या मुघलांना आणि बादशहा औरंगजेबाला मराठा साम्राज्य गिळंकृत करण्याची स्वप्ने पडू लागली. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना औरंगजेबाला मराठा सत्तेला धक्कासुद्धा लावता आला नव्हता. त्यामुळे महाराजांच्या पश्चात आता मराठा साम्राज्य घशात घालायचेच, या नापाक इराद्याने स्वत: औरंगजेब 1683 साली तब्बल पाच लाखांची फौज, तोफा, दारूगोळा आणि सगळ्या शाही इंतजामानिशी महाराष्ट्रात दाखल झाला. 1689 साली फंदफितुरीने छत्रपती संभाजी महाराजांचा घात केल्यानंतर तर औरंगजेबाला असे वाटत होते की, आता बोलबोल म्हणता आपण मराठा साम्राज्यावर कब्जा करू; पण छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती महाराणी ताराबाई, सरसेनापती धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह छोट्या-मोठ्या मराठा सरदारांनी आणि किल्लेदारांनी औरंगजेबाला मरेपर्यंत झुंजविले; पण मराठा साम्राज्य त्याच्या हाताला लागू दिले नाही.

अशाच एका मोहिमेवेळी खवासपूर (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील माणगंगा नदीच्या कोरड्या पात्रात औरंगजेबाच्या छावणीचा तळ पडला होता. माणगंगा म्हणजे कायमस्वरूपी दुष्काळी गणल्या गेलेल्या माणदेशातील नदी. माणगंगा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या कुळस्करवाडी (कुळकजाई) गावच्या सीतामाईच्या डोंगरात उगम पावते आणि पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावानजीक भीमा नदीला जाऊन मिळते. माणगंगा वर्षभर तशी कोरडी ठणठणीत असायची, त्यामुळे औरंगजेबाची छावणी तशी निर्धास्त होती; पण त्या दिवशी माणगंगेला क्रूरकर्मा औरंगजेबाची खोड मोडण्याची जणू काही लहरच आली होती. तो दिवस होता 1 ऑक्टोबर 1700! खवासपुरातील माणगंगेचे पात्र कोरडे ठणठणीत होते, पावसाचा कुठे मागमूसही नव्हता; पण त्याच रात्री माणगंगेच्या उगमाकडच्या भागात घनघोर आणि मुसळधार पाऊस झाला आणि ऐन मध्यरात्री माणगंगेला महापूर आला. गाढ झोपेत असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत महापुराचे पाणी शिरले आणि सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. औरंगजेबासह त्याच्या सरदारांना आणि सैनिकांना नेमके काय झाले आहे, तेच समजेनासे झाले. या महापुराच्या पाण्यात औरंगजेबासह त्याच्या सरदारांच्या छावण्या, दारूगोळा, अनेक सैनिक, उंट, घोडे वाहून गेले.

सगळ्या छावणीत अशा पद्धतीने हाहाकार माजलेला असताना औरंगजेबाला वाटले की, मराठा फौजेने हल्ला केला की काय? कारण ऐन काळोख्या रात्री मराठा फौजांनी केलेल्या काही हल्ल्यांची चव औरंगजेब आणि त्याच्या सरदारांनी अनेकवेळा चाखली होती. त्यामुळे मराठा फौजांच्या हल्ल्याच्या भीतीने आणि जीवाच्या आकांताने औरंगजेब वाट फुटेल तिकडे पळत सुटला आणि पाय घसरून माणगंगेच्या पात्रात तोंडघशी पडला. औरंगजेब पडता पडता त्याच्या उजव्या पायाचा गुडघा नदीतील एका दगडावर आदळला, नुसता आदळला नाही, तर गुडघ्याची वाटी निखळली आणि औरंगजेबाला कायमस्वरूपी अपंगत्व आले. त्यानंतर औरंगजेबाच्या दरबारातील आणि देशभरातील शेकडो हकिमांनी त्याच्यावर नाना प्रकारचे उपचार केले; पण औरंगजेबाचा गुडघा काही बरा होऊ शकला नाही. त्यामुळे औरंगजेबाला मरेपर्यंत लंगडत लंगडतच चालावे लागले. या घटनेवेळी औरंगजेबाचे अनेक सरदार आणि सैनिकांचीही अशीच घाबरगुंडी उडून तेही सैरावैरा पळत सुटले होते. यावरून औरंगजेबाच्या लष्करात मराठा फौजांची किती धास्ती होती त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.

मराठा साम्राज्य घशात घालण्याच्या इराद्याने महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला अखेर इथल्या मातीनेच 1707 साली घशात घातले. इथल्या मातीतच त्याची कबर खणली गेली आणि मराठा साम्राज्याचा झेंडा औरंगजेबाच्या पतनानंतरही फडकतच राहिला. औरंगजेबाच्या जवळपास 25 वर्षांच्या संघर्षात माणदेशाने मात्र त्याला अशा पद्धतीने जन्माची अद्दल घडविली होती. दस्तुरखुद्द औरंगजेबाच्याच बखरकारांनी या कटू आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

औरंगजेब होता शौचालयात..!

खाफिखान नावाचा आणखी एक बखरकार आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी लिहितो की, पाण्याचा पूर येताच छावणीतून विलक्षण आक्रोश उठला. रात्रीच्या भयंकर अंधारात जो आरडाओरडा झाला, त्यामुळे वातावरण कंपनामय झाले. त्यावेळी औरंगजेब बादशहा शौचालयात होता. त्याला वाटले की, मराठ्यांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत आकांत झाला आहे. तो घाईघाईने उठून बाहेर येऊ लागला. त्या गडबडीत त्याचा पाय घसरला, त्याच्या गुडघ्याला भयंकर मार लागला, तो काही शेवटपर्यंत बरा झाला नाही.
– खाफिखान, औरंगजेबाचा बखरकार आणि प्रत्यक्ष घटनादर्शी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT