मुंबई : वृत्तसंस्था : चालू वर्षात अॅन्युअल प्री-टॅक्स प्रॉफिट अंतर्गत (वार्षिक कर पूर्व नफ्यात) 1.04 लाख कोटी रुपये नफा कमवणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. स्वत: कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. चौथ्या तिमाहीत मात्र गतवर्षाच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 1.8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
गतवर्षी याच तिमाहीत कंपनीने 19 हजार 299 कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला होता. यंदा तो 18 हजार 951 कोटी रुपये झालेला आहे. रिलायन्सच्या नफ्यात 5 ते 10 टक्क्यांनी घसरण होईल, असे अनेक आर्थिक विश्लेषक छातीठोकपणे सांगत होते. ते मात्र तोंडावर पडले आहेत. मार्च तिमाहीदरम्यान कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात वार्षिक 11.3 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 2 लाख 40 हजार 715 कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. गतवर्षी याच तिमाहीत ते 2 लाख 16 हजार 265 कोटी रुपये होते.
मार्च तिमाहीतील निष्कर्ष जाहीर होण्यापूर्वीच रिलायंसचे शेयर सोमवारी 0.77 टक्के वृद्धीसह 2,962.90 रुपयांवर बंद झाले होते. रिलायन्सच्या शेअरमध्येही 2024 वर्षात आजअखेर 14.39 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
रिलायंस जिओने 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत 5 हजार 337 कोटी रुपये नफा मिळविला. गतवर्षी याच काळात तो 4 हजार 716 कोटी रुपये होता. वर्षाला नफ्यात 13.2 टक्क्यांची वाढ आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीच्या उत्पन्नात 11 टक्क्यांनी वाढ होऊन ते 25 हजार 959 कोटी रुपयांवर गेले आहे. गतवर्षीच्या चौथ्या तिमाहीत ते 23 हजार 394 कोटी रुपये होते. 2023-24 आर्थिक वर्षादरम्यान जिओने 20 हजार 607 कोटी रुपये नफा मिळविला आहे.
रिलायन्स रिटेलने चौथ्या तिमाहीत 76 हजार 627 कोटी रुपये महसुल मिळविला. गतवर्षीच्या तुलनेत तो 10.6 टक्के अधिक आहे. मार्च तिमाहीदरम्यान रिलायन्स रिटेलच्या नफ्यात 11.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2 हजार 698 कोटी रुपयांवर गेला आहे. गतवर्षी याच तिमाहीत तो 2 हजार 415 कोटी रुपये होता.
न्यू एनर्जी या रिलायन्सच्या पुढाकारामुळे एकूणच व्यवसायाला मजबुती मिळालेली आहे. हे क्षेत्र भविष्यातही कंपनीला दिवसेंदिवस मजबूत करत राहील.
– मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स उद्योगसमूह