Latest

फॉरेनरही थिरकताहेत भारतीय गाण्यांवर; परदेशी नागरिकांनी रिक्षा, लोकल ट्रेनमध्ये केलेल्या रील्स व्हायरल

अमृता चौगुले

प्रसाद जगताप

पुणे : भारतातील शास्त्रीय संगीताची ख्याती अगोदरच अख्ख्या जगभर पसरलेली आहे. अशातच आता भारतातील हिंदी, मराठी आणि तमीळ चित्रपटांतील गाण्यांनी परदेशी नागरिकांना भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. परदेशी नागरिक चक्क भारतीय गाण्यांवर थिरकत असल्याच्या रील्स व्हायरल होत असून, त्यांची सध्या जोरदार चर्चा आहे.

तरुणाईला सध्याच्या काळात इन्स्टाग्रामवर रील्स बनविण्याचे चांगलेच वेड लागले आहे. त्यापासून ज्येष्ठ नागरिकसुध्दा लांब राहू शकलेले नाहीत. मात्र, भारतातील नागरिकांसह आता परदेशी नागरिकसुध्दा भारतीय चित्रपटांतील गाण्यांवर नाचण्याचा आनंद घेत आहेत. यात परदेशी नागरिक 'रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम', 'आरआर' चित्रपटातील 'नाचो… नाचो…', 'आली उमलून माझ्या दारी, प्रीत नवी मखमली रे', 'बहरला हा मधुमास नवा', 'परदेसीया,' 'तू चीज बडी है मस्त मस्त', 'प्रेमिका ने प्यार से ज्यो भी कह दिया', 'पतली कमरिया बोले', 'दिल देना दिल लेना, है सौदा खरा खरा' यांसारख्या अनेक हिंदी, मराठी चित्रपटांतील गाण्यांवर थिरकण्याचा आनंद घेत आहेत.

दी क्विक स्टाईल ग्रुप आणि रिकी पाँड सध्या चर्चेत…
इन्स्टाग्राम रील्स बनवून त्यामध्ये मराठी, हिंदी आणि तमीळ गाण्यांचा वापर करून थिरकणारे अनेक परदेशी नागरिक आहेत. अनेकांचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, सध्या द क्विक स्टाईल ग्रुप आणि रिकी पाँड हे दोन खूपच चर्चेत आहेत. या दोघांनी भारतीयासह जगभरातील विविध देशांच्या तरुणाईच्या मनावर भुरळ घातली आहे.

लोकल ट्रेन आणि रिक्षामध्येही बनविले व्हिडीओ…
द क्विक स्टाईल हा परदेशी नागरिकांचा इन्स्टाग्रामवरील ग्रुप आहे. मागील महिन्यात हा ग्रुप मुंबई परिसरात होता. तेथे या ग्रुपने मुंबईतील तरुणाईशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेन आणि रिक्षामध्ये व्हिडीओ बनवून भारतीय गाण्यांवर थिरकण्याचा आनंद घेतला.

SCROLL FOR NEXT