Latest

Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

गुवाहाटी : पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही उद्या मुंबईत येणार असल्याची घोषणा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत केली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बोलताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुख-समृध्दी शांतीसाठी नवस मागितलं. सर्व आमदारांसोबत बहुमतासाठी उद्या मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर ते प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना झाले. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. शिंदे यांच्यासोबत काही आमदारदेखील होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'तुम्ही परत या, माझ्यासमोर बसा, यातून निश्‍चित मार्ग निघेल', अशा शब्दांत बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा हाक दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला. आपण मार्ग काढू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर गुवाहटी मुक्‍कामी असलेल्या बंडखोरांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीमध्ये अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे.

आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, माझे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या. माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्‍चित मार्ग निघेल.

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

SCROLL FOR NEXT