Latest

‘एआय’ची कमाल… पुतीन यांनी घेतली पुतीन यांचीच मुलाखत!

Arun Patil

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अनेक 'हमशकल' असल्याचे म्हटले जाते. बर्‍याच वेळा सार्वजनिक ठिकाणी वावरत असलेले पुतीन हे खरे नसून 'डमी' असल्याचेही म्हटले जाते. मात्र, आता खरोखरच दोन-दोन पुतीन एका कार्यक्रमात अवतरले. अर्थातच ही किमता होती 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची. पुतीन यांना नुकतंच सार्वजनिक मंचावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमात पुतीन यांना प्रश्न विचारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वत: पुतीन होते. पण यात एक मोठा ट्विस्ट होता. तो म्हणजे हे पुतीन यांचं एआय व्हर्जन होतं. यामुळे एकाच वेळी टी.व्ही.वर दोन पुतीन दिसत असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्लादिमीर पुतीन यांनी वार्षिक कार्यक्रमात आपलं एआय व्हर्जन पाहिलं तेव्हा काही वेळासाठी त्यांचाही विश्वास बसला नाही. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एआय व्हर्जनने आपण विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याची ओळख करून दिली. यावेळी त्याने पुतीन यांना न्यूरल नेटवर्क आणि आर्टिफिशयल इंटेलिजन्स यांच्या धोक्यांकडे कसं पाहता याबद्दल विचारलं. 'हॅलो, मी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तुमचे अनेक बॉडीडबल आहेत असं मी ऐकलं आहे, ते खरं आहे का? न्यूरल नेटवर्क आणि आर्टिफिशयल इंटेलिजन्स यांच्यामुळे आपल्या आयुष्यात जे धोके निर्माण होत आहेत त्याकडे तुम्ही कसे पाहता?', असा प्रश्न एआय व्हर्जनने पुतीन यांना विचारला.

हा प्रश्न ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला होता. यामुळे काही वेळासाठी पुतीनदेखील शांतपणे बसले होते. नंतर ते म्हणाले की, 'तू अगदी हुबेहूब माझ्यासारखा दिसत असून, माझ्याच आवाजात बोलत आहेस हे पाहू शकतो. पण मी विचार केला की, फक्त एकच व्यक्ती माझ्यासारखी असली पाहिजे आणि माझ्या आवाजात बोलली पाहिजे ती म्हणजे मी आहे'. पुढे ते म्हणाले, 'तसं पाहिलं तर हा माझा पहिला डबल आहे'. हा कार्यक्रम पुतीन यांचा रशियन जनतेशी वाषिर्र्क 'फोन-इन' कार्यक्रम होता.

वर्षाअखेरीस घेतल्या जाणार्‍या पत्रकार परिषदेत त्याचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रशियन नागरिकांना त्यांच्या राष्ट्रपतींशी असंख्य मुद्द्यांवर थेट बोलण्याची संधी मिळते. याच कार्यक्रमात पुतीन यांनी आपल्या एआय व्हर्जनच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. पुतीन यांचे एकापेक्षा जास्त बॉडीडबल आहेत असा एक दावा असून, पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये याची नेहमीच चर्चा असते. आरोग्याच्या समस्या असल्याने पुतीन यांच्याऐवजी या कार्यक्रमांमध्ये बॉडीडबल सहभागी होतात असाही दावा आहे. पण रशियाने नेहमीच हे आरोप फेटाळले असून, पुतीन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT