Latest

Aditi Swamy : आदितीच्या बाणाचा निशाणा थेट ‘अर्जुन’वर

मोहन कारंडे

सातारा; विशाल गुजर : तिरंदाजीत सातार्‍याचा नावलौकिक सातासमुद्रापार केलेल्या आदिती स्वामी (Aditi Swamy) या सुवर्ण कन्येच्या मेहनतीचे अखेर चीज झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणार्‍या आदिती स्वामीच्या बाणाने थेट 'अर्जुन' पुरस्काराचा (Arjuna Award) वेध घेतला. तिच्या या कामगिरीमुळे सातार्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर हिला यापूर्वी अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आदिती ही हा पुरस्कार मिळवणारी जिल्ह्यातील खेळाडू ठरली.

शेरेवाडी (ता. सातारा) या ग्रामीण भागातील आदिती गोपीचंद स्वामी (Aditi Swamy) हिने 2016 पासून तिरंदाजी या खेळाच्या सरावाला प्रारंभ केला. तिरंदाजी हा खेळप्रकार खर्चिक आहे. साडेतीन लाखांपर्यंत धनुष्य अन् साधारणतः पाच हजारांचा एक तीर. इतरही खेळांच्या अनुषंगाने खर्च, स्पर्धेसाठी प्रवास खर्च असला तरी कुटुंबीयांनी प्रसंगी कर्ज काढले; पण सराव थांबू दिला नाही. मेहनती आदितीनेही कुटुंबाच्या श्रमाची जाणीव ठेवून कसून सराव केला. खेळात काहीवेळा पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, त्यानंतर खचून न जाता पुढे मोठी मजल मारली. तिच्या धनुष्याचा टणत्कार देशाबाहेरही झाला. जागतिक पातळीवरील कामगिरीने कष्टाचे अखेर चीज झाले. आता तिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे आहे.

आदिती ही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात खेळत आहे. सध्या हा कंपाऊंड तिरंदाजी प्रकार ऑलिम्पिकमध्ये नसल्याने तिची 2024 ची ऑलिम्पिक चुकणार आहे. 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये आदिती खेळत असणार्‍या कंपाऊंड तिरंदाजी प्रकाराचा डेमो होणार असून 2025 ला त्याला मान्यतः मिळणार आहे. त्यानंतर 2028 ला होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये कंपाऊंड तिरंदाजी प्रकाराचा समावेश होणार आहे.

ओजस देवतळेही सातारचाच…

माणदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणार्‍या ललिता बाबर हिला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करतान तिला स्पोर्ट्स पर्सन ऑफ दि इअर असे म्हटले होते. तिला 2016 मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. त्यानंतर सुवर्ण कन्या आदिती स्वामीला हा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यात फक्त दोन जणांना हा पुरस्कार मिळाला असून या दोन्हीही महिला खेळाडू आहेत. दरम्यान, बालपणी नेम मारण्याची आवड असणारा मूळचा नागपूर येथील मात्र, सातार्‍यात तिरंदाजीचे प्रशिक्षण आणि शिक्षण घेणार्‍या ओजस देवतळे यालाही खेळातील सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान आदिती व ओजस दोघेही प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्याकडे घेत आहेत.

आदितीने अशी केली पदकांची लयलूट

आदितीने आजपर्यंत खेळलेल्या खेलो इंडियात दोनवेळा सुवर्ण, गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक, थायलंड येथील आशियाई स्पर्धेत सांघिक रौप्य, इराक येथे सांघिक सुवर्ण, शारजाह येथे सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक रौप्य पदक पटकावले. कोलंबिया येथील जागतिक तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवून तिने विश्वविक्रम केला. आयर्लंडमध्ये 18 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियन ठरली. जर्मनीतील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सांघिक प्रकारात व वैयक्तिक सुवर्ण घेऊन तिने इतिहास घडवला. तिने आजपर्यंत खेळलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 10 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्यपदक पटकावली आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 7 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 27 पदके मिळवली आहेत.

तिरंदाजी या खेळात एकाग्रता महत्त्वाची आहे. यासाठी आदिती मेडिटेशन, प्राणायाम, एकाग्रतेचा व्यायाम करण्याबरोबरच संतुलित आहार घेते. पहिल्यापासूच शांत, संयमी असल्याने तिने या खेळातील बारकावे आत्मसात केले. खेळामुळे एकाग्रता वाढल्याने अभ्यासातही तिला मदत होत आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने आम्ही तिचे आई, वडील आहोत याचा अभिमान वाटत आहे.

– गोपीचंद स्वामी, (आदितीचे वडील)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT