Latest

‘पुणे सहकारी’सह तीन बँकांवर आरबीआयचे निर्बंध

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन सहकारी बँकांतील अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) वाढल्यामुळे त्यांच्यावर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये पुण्यातील पुणे सहकारी बँक लिमिटेड, डिफेन्स अकाऊंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि नाशिकमधील द फैझ मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे.

आरबीआयने या तिन्ही बँकांचे व्यवहार बंद केले आहेत. आर्थिक निर्बंध पुनरावलोकनाच्या किंवा फेरविचाराच्या अधीन असतील, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या बँकांच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्याबाबत मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार पुणे सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांना 10 हजार रुपये, डिफेन्स अकाऊंट बँकेच्या ठेवीदारांना 30 हजार रुपये आणि द फैझ बँकेच्या ठेवीदारांना 2 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल, असे आरबीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ठेवीदारांसाठी पर्याय
बँकेच्या पात्र ठेवीदारांना ठेव विमा दावा करण्याचा अधिकार असेल. त्यांना ठेवीच्या पाच लाख रूपयापर्यंतच्या रकमेसाठी ठेव विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) अर्ज करता येईल.

निर्बंध लादलेल्या बँकांची 31 मार्च 2022 अखेरची आर्थिक स्थिती (रक्कम कोटींमध्ये)
बँकेचे नाव             ठेवींची रक्कम     कर्जवाटप    अनुत्पादक कर्जप्रमाण
डिफेन्स अकाऊंट    24 कोटी         19 कोटी              32 टक्के
पुणे सहकारी        12.58 कोटी       9.70 कोटी          20 टक्के
द फैज मर्कंटाइल  16.26 कोटी       9.30 कोटी           47 टक्के

SCROLL FOR NEXT