मुंबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन ने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घातली आहे. यात त्याने पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदी आणि भारताचा अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांना मागे टाकले आहे.
अश्विनने दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी 3 विकेटस् घेतल्या. या बरोबरच तो सर्वात जास्त वेळा एका कॅलेंडर वर्षात 50 हून अधिक विकेटस् घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडच्या ब्रायन यंग याला बाद केल्यानंतर अश्विनने चौथ्यांदा विकेटस्ची पन्नाशी पार केली.
यापूर्वी अश्विनने 2015, 2016 आणि 2017 या सलग तीन वर्षांत अशी कामगिरी केली होती. भारताच माजी कर्णधार अनिल कुंबळे याने 1999, 2004 आणि 2006 या सालात पन्नासहून जास्त विकेटस् घेतल्या होत्या. याशिवाय हरभजन सिंगने 2001, 2002 आणि 2008 साली 50+ विकेटस् आपल्या नावावर केल्या होत्या. कपिल देव यांनी (1979 आणि 1983) दोन वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.
शाहिन आफ्रिदी, हसन अलीच्याही पुढे अश्विन
या कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेटस् घेण्याचा बहुमानही रविचंद्रन अश्विन ला मिळाला आहे. त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याला मागे टाकले. आफ्रिदीच्या नावावर 44 विकेटस् आहेत. तर, अश्विनच्या नावापुढे आता 51 विकेटस्ची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दोघेही बरोबरीत होते; पण अश्विनने सामन्यात आतापर्यंत 7 विकेटस् मिळवून आफ्रिदीच्या पुढे बाजी मारली. या यादीत पाकिस्तानचाच हसन अली तिसर्या क्रमांकावर आहे. त्याच्या 39 विकेटस् आहेत.