भारताने नामिबिया विरुद्धचा सामना ९ विकेट्सनी जिंकला. टी २० वर्ल्डकप २०२१ मधील हा अखेरचा सामना होता. याचबरोबर प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री आणि कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा अखेरचा टी २० सामना होता. यानंतर विराट भारतीय टी २० संघाचे कर्णधार पद भूषवणार नाही. तर रवी शास्त्रींचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळही समाप्त झाला.
रवी शास्त्री यांचा पाच वर्षाचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यांनी नामिबिया विरुद्धच्या सामन्यानंतर अखेरचे टीम इंडियाला ड्रेसिंग रुममध्ये संबोधित केले. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने अनेकदा चांगली कामगिरी केली. विशेषकरून कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त होती.
शास्त्रींचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी २० वर्ल्डकपनंतर संपुष्टात आला. त्यांनी नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर अखेरचे टीम इंडियाला संबोधले. यावेळी ते म्हणाले की, 'तुम्ही सर्व जण एक संघ म्हणून माझी जी अपेक्षा होती त्यापेक्षाही चांगली कामगिरी करुन दाखवली. गेल्या काही वर्षात तुम्ही जगभरात अनेक ठिकाणी खेळलात. तुम्ही प्रत्येकाला विविध क्रिकेट प्रकारात मात दिली आहे. यामुळे तुम्ही क्रिकेटमधील एक ग्रेट टीम म्हणून नावारुपाला आला आहात.' रवी शास्त्री यांची ही ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ क्लिप बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली.
यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारताकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण, टीम इंडियाने आपल्या टी २० वर्ल्डकपची सुरुवात अत्यंत खराब केली. पारपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून भारत इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभूत झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनेही भारताला पराभवाची धूळ चारली. यामुळे पहिल्या दोन सामन्यातच भारतीय संघाच्या सेमी फायनलच्या स्वप्नांना तडा गेला.
टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकून आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र अफगाणिस्तान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला आणि टीम इंडियाची रनरेटवर सेमी फायनल गाठण्याची भाबडी आशाही गळून पडली.
वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाने नामिबियाचा पराभव करत आपली टी २० वर्ल्डकपची सांगता विजयाने केली. याचबरोबर संघाने प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विजयी निरोप दिला.