Latest

International Yoga Day 2023 | रवी कुलकर्णी दाम्पत्याचा पाण्याखाली योग प्रात्यक्षिकांचा विक्रम

अविनाश सुतार

: आंतरराष्ट्रीय योगदिनाचे (International Yoga Day 2023)  औचित्य साधून उरणमधील माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी योग प्रशिक्षिका विदुला कुलकर्णी यांनी १३ फूट पाण्याखाली ऑक्सिजन सिलिंडरच्या सहाय्याने २२ मिनिटे योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांनी जागतिक योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर विक्रम प्रस्थापित केला. पाण्याखालील अशा प्रकारची प्रात्यक्षिके हा देशातील बहुतेक पहिलाच विक्रम असावा, असे माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले.

उरण येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये ही योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पाणबुड्यासाठी लागणार्‍या ड्रायव्हिंग साहित्याचा अचूक वापर करून या दांपत्याने पाण्याखाली योग प्रात्यक्षिके यशस्वीपणे करून दाखवली.

International Yoga Day 2023 : ओंकार, प्रार्थना आणि सूर्यनमस्कारांनी योगाला प्रारंभ

ओंकार, प्रार्थना आणि सूर्यनमस्कारांनी प्रारंभ करून कुलकर्णी दाम्पत्याने या प्रात्यक्षिकांना सुरुवात केली. प्रत्यक्षात, ड्रायव्हिंग इक्विपमेंटमुळे पाण्याखाली स्थिर राहणे बर्‍यापैकी अवघड जात होते. पण, कुलकर्णी दांपत्याने गेले काही दिवस चिकाटीने सराव केल्यामुळे त्यांनी पाण्याखाली स्थिर राहून आपले लक्ष्य साध्य केले. त्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये पर्वतासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, वृक्षासन, नटराजासन, देवीची पोझ या उभे राहून करण्याच्या आसनांचा समावेश होता. त्याचप्रमाणे बसून किंवा विशिष्ट पोझमध्ये करण्याच्या पर्वतासन, सिंहासन, भुजंगासन, शलभासान, पद्मासन या आसनांची देखील त्यांनी प्रात्यक्षिके दाखवली. त्यानंतर पाण्याखाली मेडिटेशन करून तसेच ओंकार आणि श्लोक म्हणून त्यांनी प्रात्यक्षिकांची यशस्वी सांगता केली.

१३ फूट पाण्याखाली तब्बल २२ ते २५ मिनिटे योगाची ही प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर त्यांनी वर येऊन उपस्थितांना अभिवादन केले. योगदिनाचे औचित्य साधून ही अनोखी प्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. या प्रात्यक्षिकांदरम्यान त्यांना माजी मरीन कमांडो विनोद कुमार आणि राम सवार पाल यांचे सहकार्य लाभले. प्रीतम पाटील यांनीही साहाय्य केले.

रवी कुलकर्णी यांचा हा तिसरा विक्रम ठरला आहे. यापूर्वी त्यांनी २००३ मध्ये पाण्याखालचा लग्न सोहळा आयोजित करून विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टरोजी ६ जणांच्या साथीने पाण्याखाली संचलन, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गाऊन जागतिक विक्रम केला होता. आणि आता योगदिनाचे औचित्य साधून १३ फूट पाण्याखाली २२ मिनिटे योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT