Latest

Women’s Day : पुरुषी मक्तेदारीला नेहाचा ‘नारळ’

backup backup

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा:  उंचच उंच माडावरील नारळ काढणे हे खरे तर फारच कौशल्याचे काम. आतापर्यंत केवळ पुरुषच माडाच्या झाडावर चढून नारळ काढत होते. मात्र, पुरुषांच्या या क्षेत्रात आता महिलाही उतरल्या आहेत. (Womens Day)

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील 22 वर्षीय नेहा चंद्रमोहन पालेकर हिने देखील यामध्ये प्रावीण्य मिळवले आहे. सरसर माडावर चढत नारळ काढण्यात ती आता पारंगत झाली असून तिला आता तालुक्यातील विविध भागातून नारळ काढण्यासाठी बोलावणेही येत आहे.

मावळंगे, थूळवाडी येथील नेहा पालेकर हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. लहानपणापासून झाडांवर चढण्यात पारंगत असलेल्या नेहाला तिच्या आजीने माडाच्या झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.

हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरातील 20 नारळांच्या झाडावर तिने नियमित चढण्याचा सराव केला. नारळ पाडण्यासह नारळाच्या झाडाची सफाई करणे या कठीण कामातही ती तरबेज झाली आहे. नारळाच्या झाडावर पडलेला एखादा रोग असो अथवा कीड, त्यावर पावडर किंवा औषधोपचारही ती करते.

माडांना लागणारे खत व अन्य गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहितीही ती नारळाची झाडे असणार्‍या मालकांना देते. नारळाच्या झाडासाठी ती 'कोकोनट क्लायंबर' या शिडीचा वापर करते. अगदी तीस ते पन्नास फुटापर्यंत उंचीच्या माडांवर न घाबरता चढते. सुरक्षेचा उपाय म्हणून हल्ली तिने सेफ्टी बेल्ट वापरण्यासही सुरुवात केली आहे.

नारळासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी व जागृती करण्यासाठी 'कोकोनट फ्रेंडस' म्हणून व्हॉटसअ‍ॅप ग्रुपही सुरु असून, त्यात नारळ विषयक माहितींची नेहमी देवाण-घेवाण केली जाते.आजीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज पंचक्रोशीसह तालुक्यात माझी ओळख निर्माण झाली असल्याचेही तिने सांगितले.

'कल्पवृक्षा'बाबत जनजागृती

नारळाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. झावळांपासून छप्पर, हिरपासून झाडू, खोबरे, तेल, सुंभ तर खोडापासून वासे तयार केले जातात. एकूणच नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो.

नारळ विक्रीतून आर्थिक उत्पन्नही मिळते म्हणून नारळ लागवडीबाबत नेहा पालेकर ही ग्रामस्थांमध्ये जागृती करीत आहे. जेथे पाण्याची व्यवस्था आहे, अशा रिकाम्या जागांवर नारळाची लागवड करा, असा संदेशही तिने दिला आहे.

SCROLL FOR NEXT