अंतरवाली सराटी; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही, तर मराठा आरक्षण आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अशा 2 सत्रांत रास्ता रोको केला जाणार आहे. त्यानंतर 3 मार्च रोजी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाचवेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक संमत केल्यानंतरही सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. (Manoj Jarange Patil)
मराठा आरक्षणाचे हे शेवटचे आंदोलन असेल. ते शांततेतच झाले पाहिजे. कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका. जाळपोळ करू नका. आंदोलन संपल्यानंतर शेतात जाऊन काम करा. प्रत्येक दिवशी रास्ता रोको करून सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणा. आमदार, खासदार आणि मंत्री यांना दारातही फिरकू देऊ नका. या सर्वांनी गावबंदी झाल्याचे समजून घ्यावे. निवडणूक काळात आलेल्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या गाड्या परत जाऊ देऊ नका. त्यांची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली पाहिजे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांची गैरसोय नको
सध्या बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. गरज भासली तर तुम्ही तुमच्या गाड्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोहोचवा, असे ते म्हणाले.