Latest

Rashid Khan : युद्धाच्या छायेत वाढला अन् क्रिकेटपटू बनला

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : राशिद खानच्या (Rashid Khan) या नावाला आता ओळखीची गरज नाही. एकेकाळी जीव वाचवण्यासाठी वडिलांसोबत अफगाणिस्तानातून पाकिस्तानात पळून गेलेला राशिद आज कोट्यवधी लोकांसाठी आदर्श आहे. या चॅम्पियन खेळाडूने आयपीएलच्या माध्यमातून जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.

2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणार्‍या राशिदला कधीही क्रिकेटर बनण्याची इच्छा नव्हती. मुलाने डॉक्टर व्हावे, अशी आईची इच्छा होती आणि मुलालाही आईचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे होते, पण नशिबात काही वेगळेच होते.

20 सप्टेंबर 1998 रोजी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात जन्मलेल्या राशिदची सुरुवातीची वर्षे रक्तपातात गेली. 2001 मध्ये अफगाणिस्तानात सुरू झालेल्या युद्धाने राशिदचे बालपण हिरावून घेतले. तालिबान आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे राशिदला पाकिस्तान सीमेजवळील निर्वासितांच्या छावणीत राहावे लागले.

राशिदला सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये फलंदाजीची आवड होती. तो सचिन तेंडुलकरचा चाहता होता, त्यामुळे साहजिकच त्याच्यासारखे शॉटस् खेळायचे होते; पण मित्र म्हणाले की, तू फलंदाजीपेक्षा चांगली गोलंदाजी करतोस. जवळच्या मित्रांचा सल्ला राशिदला टाळता आला नाही.

युद्धाच्या परिस्थितीत राशिदच्या पालकांनी त्याला कडक सूचना केल्या होत्या की काहीही झाले तरी घराबाहेर पडू नकोस. एकदा राशिद गुपचूप क्रिकेट खेळायला गेला आणि फिल्डिंग करत असताना त्याचा हात रक्ताने माखला होता. राशिदने 3 आठवडे मूकपणे सर्व वेदना सहन केल्या आणि कोणालाही ही हे गुपित कळू न देता वेदना सहन करत राहिला. अफगाणिस्तानातील परिस्थिती वर्षानुवर्षे बदलली नाही तेव्हा राशिद कुटुंबासह पाकिस्तानात गेला.

इंग्रजी शिकण्याची इच्छा (Rashid Khan)

एकदा अचानक राशिदला इंग्रजी बोलण्याचे वेड लागले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने 6 महिने विशेष इंग्रजी शिकवणी घेतली. मग स्वत: इंग्रजी शिकल्यानंतर त्याने 6 महिने इंग्रजी ट्यूशनही घेतले. मात्र, तोपर्यंत क्रिकेटचा जोश नसानसांमध्ये भरला होता, त्यामुळे इंग्लिश हे प्रकरण मागे राहिले. अंडर-19 क्रिकेटमधील कामगिरी खराब असताना मोठा भाऊ रागाने म्हणाला की, तू क्रिकेट सोड आणि अभ्यासक्रमाची पुस्तके काढून अभ्यास सुरू कर.

राशिदचे मन दु:खी झाले. डोळ्यात पाणी आणत त्याने आईला बोलावून सर्व हकीकत सांगितली. आई म्हणाली की काल जरी तू यशस्वी झाला नाहीस तरी क्रिकेट सोडू नकोस. यानंतर राशिदने मागे वळून पाहिले नाही कारण त्याच्या स्वप्नाला त्याच्या आईची साथ मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT