Latest

Ranji Trophy 2024 : मुंबईच्या फलंदाजांची कमाल! 10व्या-11व्या क्रमांकावर खेळत ठोकली शतके, 78 वर्षांनंतर चमत्कार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईचे खेळाडू तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी अनोखा विक्रम रचला. बडोदाविरुद्ध खेळताना या दोघांनी 10 व्या आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजी येत संस्मरणीय शतके झळकावली. तनुष 120 धावा करून नाबाद राहिला, तर तुषार देशपांडे 123 धावांवर बाद झाला.

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात 10 व्या आणि 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी दोन्ही वेळा भारतीय खेळाडूंनीच केली आहे. 78 वर्षांपूर्वी 1946 मध्ये चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांनी इंडियन्स संघासाठी इंग्लंडमधील सरे काऊंटीविरुद्ध 10 व्या आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली होती.

मुंबईचे बडोद्याला 600 धावांचे लक्ष्य (Ranji Trophy 2024)

तनुष आणि तुषारच्या शतकांमुळे मुंबईने दुसऱ्या डावात 569 धावा केल्या आणि बडोद्यासमोर विजयासाठी 600 धावांचे लक्ष्य ठेवले. तत्पूर्वी, मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बडोद्याचा पहिला डाव 348 धावांवरच आटोपला.

337 धावांत 9 विकेट पडल्या

दुसऱ्या डावात 337 धावांवर मुंबईच्या 9 विकेट पडल्या होत्या. यानंतर तनुष आणि तुषारने शेवटच्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली. तनुषने आपल्या खेळीत 129 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तर तुषारने 11 वा फलंदाज म्हणून खेळताना 129 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

देशपांडे तिसरा भारतीय फलंदाज

11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा देशपांडे हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11व्या क्रमांकावर असलेला भारतीय क्रिकेटपटू म्हणून त्याने सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या केली. यापूर्वी हा विक्रम शुटे बॅनर्जी (121) यांच्या नावावर होता. देशपांडे अखेर 123 धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी 232 धावांवर संपुष्टात आली, जी रणजी ट्रॉफी रेकॉर्ड्च्या एक धाव कमी आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये 10व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी

1946 मध्ये सरवटे आणि बॅनर्जी यांच्यात 10 व्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी झाली होती. भारतासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10व्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी आहे. तर रणजी ट्रॉफीमधील विक्रम अजय शर्मा आणि मनिंदर सिंग यांच्या नावावर आहे. दिल्लीकडून खेळताना शर्मा आणि सिंग यांनी 1991-92 च्या रणजी उपांत्य फेरीत वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध 233 धावांची भागीदारी केली होती. शर्माने नाबाद 259, तर सिंगने 78 धावा केल्या. तो सामना दिल्लीने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जिंकला होता.

SCROLL FOR NEXT