Latest

सिंहगड भागात महाकाय रानगव्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचा पाठलाग

अमृता चौगुले

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या मणेरवाडी, थोपटेवाडी, खानापूर भागात एका महाकाय रानगव्याने धुमाकूळ घातला. सोमवारी (दि. १) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या पायथ्याच्या मणेरवाडी (ता. हवेली ) येथील स्मशानभूमीच्या झाडीत अचानक रानगवा शिरला. त्यावेळी शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या दिशेने धाऊन आला.जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक तानाजी भोसले यांनी स्मशानभूमीच्या झाडीत धाव घेतली. त्यावेळी रानगवा समोर माणूस दिसताच त्याचा पाठलाग करत होता. तानाजी भोसले यांनी शेतकऱ्याला झाडावर चढण्यास सांगितले. त्यामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले.

चिडलेल्या रानगव्याच्या हल्ल्यात जिवीतहानी होण्याचा धोका असल्याने तानाजी भोसले तातडीने प्रसंगावधानता दाखवत पुढे आले.
आरडाओरडा करत स्थानिक युवकांच्या मदतीने स्मशानभूमीच्या रानातुन रानगव्याला बाहेर काढले‌. त्यानंतर रानगवा पुणे-पानशेत रस्त्याच्या दिशेने खानापूरकडे निघाला. खानापुर परिसरात दाट लोकवस्ती तसेच पानशेत रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्याने उग्र रानगव्याच्या हल्ल्यात मोठ्या दुर्घटना घडण्याचा धोका होता. त्यामुळे निधड्या छातीच्या भोसले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चपळाईने पुढे जात रानगव्याला विरूद्ध दिशेला सिंहगडाकडे आणले.

थोपटेवाडी गावाच्या रानातुन सिंहगड पायथ्याच्या नवलाई दऱ्यातील जंगलात रानगव्याला हाकत आणले. तब्बल दिड तास रानगव्याचे थरार नाट्य सुरू होते. दुपारी साडे अकरा वाजता सिंहगडच्या घनदाट जंगलात रानगव्याला पोहचवण्यात यश आले असले तरी रानगवा पुन्हा गावात शेतात शिरण्याची भिती असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

दोन दिवसांपूर्वी पानशेतजवळील आंबी सोनापुरच्या रानात रानगवा स्थानिक शेतकऱ्यांना दिसला होता. रानगव्याने उग्र रूप धारण केले आहे. तो कळप सोडुन आल्याने बिथरला आहे. नर जातीचा पुर्ण वाढ झालेल्या रानगव्याचा आकार लहान हत्तीएवढा आहे. रानावनात त्याने धुमाकूळ घातला आहे. रानगव्याने उग्र रूप धारण केले आहे. माणसे, जनावरांची चाहूल लागताच तो धावुन जात आहे. शेतकरी, गुराख्यांचा पाठलाग करत असल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले, रविवारी रानगवा आंबीच्या रानात होता. आज तो सिंहगड भागात आला आहे. रेक्सु ऑपरेशन करून रानगव्याला त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडले जाणार आहे. रानगवा बिथरला असल्याने शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

गिर्यारोहक तानाजी भोसले म्हणाले, माणसाची चाहूल लागताच रानगवा अंगावर धाऊन येत आहे. तो धष्टपुष्ट आहे. त्याने आक्रमक रूप धारण केले आहे. त्यामुळे त्याला पकडून कळपात सोडणे गरजेचे आहे अन्यथा रानगव्याच्या हल्ल्यात जिवीतहानी होण्याचा संभव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT