अयोध्या, वृत्तसंस्था : राजा दशरथ यांच्या महालात अयोध्येच्या राजपुत्राचे वयाच्या पाचव्या वर्षी जसे लाड पुरविले गेले, अगदी तशीच रामलल्लाच्या पुजेची पद्धत ठरविण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर ती नियमित सुरू आहे. रामलल्लाला तसेच पहाटे झोपेतून उठविले जाते. तसेच जेवण दिले जाते. चारही वेदांचा पाठ रामलल्ला ऐकतात. शास्त्रीय संगीत श्रवण करतात. राजपुत्राच्याच थाटात भाविकांना दर्शनही देतात.
19 लाख भाविकांची भेट
प्राणप्रतिष्ठेनंतर आजअखेर 6 दिवसांत अयोध्येला 19 लाख भाविकांनी भेट दिली आहे.
रामलल्लाची दिनचर्या
जागरण : रामलल्लाची दिनचर्या पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत ठरलेली आहे. अर्चक पहाटे रामलल्लाला माता कौशल्येच्या मायेने उठवितात. बाळरामाचे हे राजपुत्र म्हणून उघड्या डोक्यासह कुणाला सामोरे जात नाहीत. त्यामुळे त्यांना पगडी वा मुकूट परिधान केला जातो.
प्रसाद : फळे, रबडी, मालपुआ, लोणी, खडीसाखर, मलई आदीचा प्रसाद चढविला जातो.
पूजन : मंगलारती केली जाते. रामलल्लाला पांढर्याशुभ्र गाय आणि वासराचे दर्शन करवले जाते. मग हत्तीचे दर्शन घडविले जाते. रामलल्ला स्वत: मग दानधर्म करतात आणि गर्भगृहाचा पडदा पडतो.
स्नान : रामलल्लांना मग स्नान करवले जाते. दिवस आणि सणाच्या हिशेबाने त्यांना वस्त्रे घातली जातात. दिवसाच्या हिशेबाने वस्त्रांचे रंग ठरलेले आहेत. सणासुदीला पिवळी वस्त्रे ठरली आहेत.
शृंगार आरती : प्रसादग्रहण आणि शृंगार आरती सकाळी 6.30 पर्यंत संपन्न होते. मग रामलल्ला भाविकांना दर्शन देतात. 9.30 वाजता काहीवेळ पडदा टाकला जातो. पुढे सकाळी 11.30 वाजेपर्यंत दर्शन सुरू असते.
राजभोग : सकाळी 11.30 वाजता राजभोग चढविला जातो. दुपारी 12 वाजता राजभोग आरती होते. रामलल्लांना पदे ऐकविली जातात. संगीतसेवा होते. 12.30 वाजता दुपारची विश्रांती घेतात. अडीच वाजता लल्लांना पुन्हा उठविले जाते. आरती होते. दर्शन सुरू केले जाते.
संध्यारती : सायंकाळी 6.30 वाजता संध्यारती होते.
शयनारती : रात्री 8.00 ते 8.30 दरम्यान शयनआरती होते. तत्पूर्वी प्रसाद चढविला जातो. संगीत लावले जाते. चारही वेद लल्लांना ऐकविले जातात.
शयन : तद्नंतर शाही बिछाना टाकला जातो. थंडीत हिटर तर उन्हाळ्यात एसी लावला जाईल. रामलल्ला निजले की अर्चक द्वारपालाला लक्ष ठेव म्हणून बजावतात मगच गर्भगृहाबाहेर पडतात. लल्लाच्या जवळच प्यायला म्हणून पाणी ठेवले जाते.