Latest

Rameshbabu Praggnanandhaa : आर. प्रज्ञानंदचा जगज्जेत्या लिरेनला धक्का

Shambhuraj Pachindre

विझ्क आन झी-नेदरलँडस; वृत्तसंस्था : बुद्धिबळातील टिनेजर सुपरस्टार आर. प्रज्ञानंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विश्वजेत्या डिंग लिरेनचा सनसनाटी पराभव केला. शिवाय, याचवेळी रेटिंगमध्ये भारताचा महान खेळाडू विश्वनाथन आनंदला लाईव्ह रेटिंगमध्ये पिछाडीवर टाकण्याचा पराक्रमही गाजवला. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत 18 वर्षीय प्रज्ञानंदने धडाकेबाज विजयासह 2748.3 रेटिंग मिळवले. पाचवेळा विश्वजेतेपद मिळवणार्‍या आनंदचे रेटिंग 2748 इतके आहे. बुद्धिबळातील मानांकन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या टप्प्यात जाहीर केले जाते. (Rameshbabu Praggnanandhaa)

मंगळवारी काळ्या मोहर्‍यांनी खेळत असताना प्रज्ञानंदने 62 चालीत विजय मिळवला. त्याने या स्पर्धेच्या मागील आवृत्तीतदेखील लिरेनला पराभवाचा धक्का दिला होता. या मास्टर्स इव्हेंटमध्ये त्याच्या खात्यावर आता अडीच गुण आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल बोलताना तो म्हणाला, 'ओपनिंगपासूनच मी वर्चस्व प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. पटावर एक प्यादे जादा असल्याने मला याचा लाभ घेता आला. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी साकारणे हे माझे या स्पर्धेतील मुख्य ध्येय आहे. एरवी, स्पर्धेत 9 फेर्‍या असतात; पण येथे 13 फेर्‍या आहेत. त्यामुळे येथे एक स्पर्धा अधिक खेळण्यासारखे आहे. मी सर्वोत्तम कामगिरी साकारण्यावर भर देत आहे'.(Rameshbabu Praggnanandhaa)

टिनेजर भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद अलीकडे उत्तम बहरात राहिला असून, गतवर्षी त्याने विश्वचषक स्पर्धेत मॅग्नस कार्लसनपाठोपाठ दुसर्‍या स्थानी झेप घेतली. शिवाय, यासह कँडिडेटस स्पर्धेसाठी पात्रताही संपादन केली होती. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत मास्टर्स गटात डच ग्रँडमास्टर अनिश गिरी आघाडीवर आहे. सध्या त्याच्या खात्यावर साडेतीन गुण आहेत. अलिरेझा फिरोझा 3 गुणांसह त्याच्या पाठोपाठ आहे. चौथ्या फेरीत जॉर्डन फॉरेस्टविरुद्ध बरोबरी पत्करावी लागल्यानंतर विदित गुजराती 2 गुणांवर आहे. आता गुरुवारी होणार्‍या पाचव्या फेरीत प्रज्ञानंदची पुढील लढत अनिश गिरीविरुद्ध होईल, तर गुकेश व विदित अनुक्रमे इयान नेपोमिन्याची व मॅक्स यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT