Latest

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना शरद पवार व सोनिया गांधी यांच्याकडे गहाण ठेवली

backup backup

खेड; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना शरद पवार व सोनिया गांधी यांच्याकडे गहाण ठेवली आहे, अशी जहाल टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली. खेड तालुक्यातील खाडी पट्टयातील नांदगाव येथे गुरूवारी (दि. १२) सायंकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली. गुहागर विधानसभा मतदारसंघात त्यांनी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. या सभेला आमदार योगेश कदम देखील उपस्थित होते. खाडीपट्टा भागातील हजारो कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, आज देखील खाडीपट्टा माझाच आहे, हे आपण दाखवून दिले आहे. गेले पाच ते सहा दिवस अनेक मंडळी या सभेला जाऊ नका म्हणून आव्हान करत होते. खाडी पट्ट्यातील प्रत्येक वाडीचा विकास केल्यानेच सर्व धर्म समभाव येथे सभेत दिसत आहे. नुसती जाकीट घातली, गाड्या घेऊन फिरलं म्हणून नेते होत नाहीत. हे सगळं कोणामुळे आले याचा विचार करा. आम्ही कुठे पक्ष सोडलाय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना शरद पवार व सोनिया गांधी यांच्याकडे गहाण ठेवली आहे. मातोश्रीवर आम्हाला संपवण्यासाठी बैठका सुरू होत्या. आम्ही काय केलं होतं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे कदम असंही म्हणाले की, मला नांदेडला, संभाजीनगर येथे पालकमंत्री केलं कारण कोकणात त्यांना पाठवायचे नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा भगवा झेंडा घेऊन शेवट पर्यंत राहणार. कोकणी शिवसैनिकांनी शिवसेना मोठी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी खोका या विषयावर बोलणार आहे. उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्ष महानगरपालिका ताब्यात ठेवून मराठी माणसाचे मोठे नुकसान केले. बाकीच्या पक्षात जुन्या नेत्यांना जपतात कारण त्यांचा अनुभव वापरता येतो. त्यामुळे खाडी पट्ट्याच्या विकासाची जबाबदारी मी घेत आहे. जसा दापोली मतदारसंघाचा विकास करतो आहे, तसा गुहागरचा देखील विकास करणार. कोयनेचे अवजल कोकणात प्रत्येक गावात कालव्याने गेले पाहिजे.

समृध्दी महामार्गासाठी हजारो कोटी खर्च होऊ शकतात मग यासाठी देखील निधी घेणार. बँकेतून कोणतेही तारण न ठेवता लघु उद्योगासाठी दहा ते पंचवीस लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोकण दुष्काळात मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले हे महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे कोकणच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करू. मुस्लिम बांधवांनी अफवावर विश्वास ठेऊ नका. आपण तीस वर्षे पेक्षा जास्त जपलेला एकोपा अबाधित राहू. यापुढे एकच लक्ष ठेऊ प्रतेक गावात विकास. आगामी दीड वर्षात खेडमध्ये कुणबी भवन व मुस्लिम भवन उभे करणार, असे आश्वासन यावेळी रामदास कदम यांनी दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT