Latest

 Prime Minister Modi : रामविचारच भारताच्या भवितव्याचा आधार; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रपतींना पत्र

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीरामांचे विचार भारताच्या गौरवशाली भवितव्याचा आधार आहे. या विचारांची शक्तीच २०४७ पर्यंत विकसीत भारताचा मार्ग प्रशस्त करेल. भव्य राममंदिर यशाचे आणि विकासाचे प्रारूप घडविण्याची प्रेरणा देत राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभेच्छापर पत्राला उत्तर दिले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणारे पत्र पाठविले होते. त्या पत्रात, प्राणप्रतिष्ठेसाठीच्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला होता. त्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी आज भावनिक उत्तर दिले. अयोध्येतील अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार झाल्यानंतर हे पत्र पाठविण्यात येत आहे. आपली अयोध्या यात्रा ही तिर्थस्थळाचा यात्रेकरू या स्वरुपाची होती. इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम असलेल्या पवित्र भूमीवर जाऊन आपल्या भावना उचंबळून आल्या होत्या. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनणे हे सौभाग्य आहे आणि जबाबदारी देखील आहे. रामलल्ला पुन्हा आपल्या जन्मस्थानी विराजमान व्हावा यासाठी अनेकांनी प्रदीर्घ काळापासून संकल्प घेतला होता. अनेक युगांपासून चाललेल्या या व्रताच्या पुर्णाहुतीचा संवाहक बनण्याचा आपल्यासाठी अतिशय भावूक आणि सौभाग्याचा क्षण होता. १४० कोटी देशवासीयांसोबत रामलल्लाचे दर्शन आणि स्वागताचा क्षण अप्रतिम होता. प्रभू श्रीराम आणि भारतावासीयांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून यासाठी आपण सदैव ऋणी राहू असे पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटले.

राष्ट्रपतींच्या पत्रातील पीएम जनमन योजनेच्या उल्लेखावरून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे, की आपली संस्कृती नेहमी वंचितांसाठी काम करण्याची शिकवण देणारी आहे. गरीब कल्याणाच्या योजनांसाठी प्रभू श्रीरामांचे विचार सदैव प्रेरणादायक आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास यामागे श्रीरामांचीच प्रेरणा आहे. त्यातून २५ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात यश आले असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT