अयोध्या, वृत्तसंस्था : अयोध्येतील राम मंदिराच्या मूळ गाभार्यात प्राणप्रतिष्ठित होणार्या रामलल्लाचा रंग सावळा असेल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी तीन मूर्तिकारांकडून साकारण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एका मूर्तीच्या निवडीसाठी शुक्रवारी गुप्त मतदान झाले. मूर्तीची निवड शनिवारी जाहीर करण्यात येईल, असे संकेतही होते. अर्थात मूर्तीची निवड झालेली आहे. औपचारिकपणे ती 5 ते 10 जानेवारीदरम्यान जाहीर केली जाईल. (Ram Mandir)
सर्वाधिक पसंतीची ठरलेली मूर्ती कर्नाटकच्या म्हैसूर येथील अरुण योगीराज यांनी साकारलेली असल्याचे सांगण्यात येते. योगीराज हे वाडियार राजघराण्याचे पिढीजात शिल्पकार आहेत. कर्नाटकमधील श्याम शिळेतून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. (Ram Mandir)
मतदानाचा निर्णय ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांच्याकडे सुरक्षित आहे. अन्य दोन मूर्ती अनुक्रमे गणेश भट्ट, सत्यनारायण पांडेय यांनी तयार केल्या आहेत. निवड झालेली मूर्ती गाभार्यात स्थापित केली जाईल. उर्वरित दोन्ही मूर्ती इच्छुक भाविकांना दिल्या जातील, असे आधी ठरले होते. नंतर मात्र निर्णय बदलला असून, नव्या निर्णयानुसार मंदिरातच विविध ठिकाणी अन्य दोन मूर्तीही स्थापित केल्या जाणार आहेत. ट्रस्टचे वकील के. परासरन, उडुपीचे स्वामी विश्व प्रसन्न तीर्थ वगळता अन्य सर्व 15 सदस्य हजर होते. अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, सरचिटणीस चंपत राय, राम मंदिर समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, युगपुरुष स्वामी परमानंद, अयोध्या नरेश बिमलेंद्रमोहन मिश्र, डॉ. अनिल मिश्र, कामेश्वर चौपाल, महंत दिनेंद्रदास, आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार, अपर मुख्य सचिव संजय प्रसाद, जिल्हाधिकारी नितीश कुमार यांचा मतदारांमध्ये समावेश होता.