Latest

Rajyasabha Election : गोयल, डॉ. बोंडे, महाडिक यांना भाजपची राज्यसभेची उमेदवारी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी (Rajyasabha Election) जाहीर केली आहे. तर काँगसने उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध कवी इम्रान प्रतापगढी यांना अनपेक्षितपणे उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. पण भाजपने तिसर्‍या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

भाजप, राष्ट्रवादी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजपचे संख्याबळ पहाता भाजपला राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा सहज जिंकता येणार आहेत. पियूष गोयल हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होते. मात्र विनय सहस्त्रबुद्धे यांना वगळले जाणार असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा होती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही चर्चा खरी ठरविली. सहस्त्रबुद्धे यांच्या ऐवजी डॉ. बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली. गोयल आणि बोंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध कवी इम्रान प्रतापगढी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना आता महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस एक जागा लढविणार असून या जागेवर गेल्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या नावाची चर्चा होती. तसेच काँग्रेस नेते मुकुल वासनिक आणि गुलाब नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र काँग्रेसचा इम्रान प्रतापगढी यांना तिकीट देऊन उत्तर प्रदेशबरोबरच महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणेच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Rajyasabha Election)

काँग्रेसमध्ये नाराजी

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. राज्याच्या बाहेरचा उमेदवार लादल्याने प्रदेश काँग्रेसमधील नेते नाराज झाले आहेत.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार निवडून जाणार आहे. या एका जागेसाठी राज्यातील अनेक नेते इच्छुक होते. यावेळी बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस हायकामंडने ही मागणी अव्हेरत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने रविवारी रात्री काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. राज्यसभेचे मावळते सदस्य आणि गेल्यावेळी महाराष्ट्रातून निवडून गेलेले पी. चिदंबरम यांना यावेळी तमिळनाडू येथून तर मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

छत्तीसगड येथून राजीव शुक्ला आणि रणजीत रंजन यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. हरियाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे येथून काँग्रेसचे मातब्बर नेते अजय माकन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्नाटकमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

राजस्थानमधून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे.

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना उद्या दिल्लीत बोलावले असल्याचे निरोप आले आहेत. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT