कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण महाविकास आघाडीत येणार नाही, मात्र भाजप विरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आपल्याला शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याबदल्यात शिवसेनेच्या राज्यभरातील उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी भूमिकाही स्पष्ट केली. याबाबत दोन दिवसांत चर्चा करून आपली भूमिका सांगू, असे ठाकरे यांनी शेट्टी यांना सांगितले आहे.
आपण महाविकास आघाडीत नाही हे शंभर टक्के बरोबर असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले की भाजपविरुद्धच्या लढ्यात पारंपरिक जागा आपली आहे हे सांगून आपण लढत आलो आहे. शिवसेनेने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, हे सांगण्यासाठी मातोश्रीवर
आलो . 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आला होता, पण आपण संघटनेमार्फतच लढत आल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष चिन्हावर कधीही निवडणूक लढविली नाही आताही लढविणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 6 जागा लढविण्याची तयारी केल्याचेही ते म्हणाले.