Latest

उसाला टनामागे जादा 400 रुपये मिळावेत : राजू शेट्टी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : साखरेची बाजारातील किंमत वाढल्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 400 रुपये प्रतिटन जादा द्यावेत; अन्यथा कारखान्यांची धुराडी सहजासहजी पेटू देणार नाही, असा इशारा देत या मागणीसाठी दि. 13 सप्टेंबर रोजी साखर उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

साखरेचा गळीत हंगाम सुरू होता तेव्हा 3100 रुपये भाव होता. आता तो 3800 ते 3900 रुपये झाला आहे. सरासरी साखरेचा दर 3600 रुपये धरला तरी साखर कारखान्यांना टनाला 600 ते 700 रुपये जादा मिळणार आहेत. यातील शेतकर्‍यांना किमान 400 रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. साखर कारखान्यांना देणे हे शक्य आहे. किमान 60 ते 70 कारखाने ही रक्कम देऊ शकतात, असेही शेट्टी म्हणाले. कर्नाटक सरकारने एफआरपीपेक्षा 150 ते 250 रुपये जादा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतू साखर कारखान्यांनी त्याला स्थगिती मिळावी म्हणून बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतू न्यायालयाने स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

खताच्या वाढत्या किंमती, पाणी टंचाई यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन एकरी सात ते आठ टनाने घटणार आहे. त्यामुळे चांगले कारखाने जास्तीत जास्त 90 ते 100 दिवस चालू शकतील. अन्य कारखान्यांचा एक-दीड महिन्यातच गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होणार आहे. त्यामुळे यासाठी संघटनेने न्यायालयीन लढाई लढण्याचेही ठरविले असल्याचे शेट्टी म्हणाले.

साखर आयुक्तांनी डिजिटल वजनकाटे बसविण्याचा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी सर्व साखर कारखान्यांनी करावी, अशी मागणीही या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. तरी शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रा. जालिंदर पाटील, राजेंद्र गड्ड्यानावर, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

विरोधात असताना आठवण येते

कोणताही पक्ष असो, विरोधात असला की त्यांना आमची आठवण येते. आम्हाला जवळ घेतात आणि सत्तेत गेले की आम्हाला ते विसरतात. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे कोणत्या आघाडीसोबत जायचे याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या एकला चलो रेच्याच भूमिकेत आहे, असेही शेट्टी म्हणाले.

SCROLL FOR NEXT