Latest

सकलजनवादी राजमाता जिजाऊ

Arun Patil

जिजाऊंचा कालखंड 75 पेक्षा जास्त वर्षांचा होता (12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674). म्हणजेच जिजाऊंचे चतुर्थ शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षानिमित्त सकल जनवादी चौकटीत त्यांच्या विचार व कार्याचा संक्षिप्त आढावा घेणे उचित ठरेल. जिजाऊंचे जीवन आणि कार्य समता, स्वातंत्र्य, न्याय, सहिष्णुता, सामाजिक सलोखा म्हणून आश्वासक होते. आदर्श होते. आजही त्यांचे विचार आणि कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत.

सामाजिक – आर्थिक परिस्थितीचे योग्य आकलन, परिस्थितीप्रमाणे नेतृत्व करणे, परिस्थितीला आकार देणे, परोपकारी वृत्ती, व्यक्तीच्या कर्तृत्वावर विश्वास, द़ृढ निश्चय, राजकारण, मुत्सद्दीपणा, प्रशासकीय गुणवत्ता, प्रेरणाशक्ती, प्रेरणेच्या आधारित प्रत्यक्ष कृती घडवणे, विद्वत्ता अशा अनेक जिजाऊंकडील गुणांची नोंद महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, राजाराम शास्त्री भागवत अशा वेगवेगळ्या लेखकांनी केली आहे.
समता ः जिजाऊंना त्यांच्या माहेरी समतेची शिकवण मिळाली होती (1598-1608). माहेर आणि सासर या दोन्ही घरांतून सामाजिक आणि स्त्री-पुरुष समतेचा वारसा मिळाला होता. कारण जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव यदूची परंपरा पाळणारे होते; तर आई म्हाळसाबाई आणि सासू उमाबाई यांचे माहेर परमार घराण्याची परंपरा पाळणारे होते. शहाजीराजे भोसले हे सूर्यवंशाची परंपरा पाळणारे. तीन घराण्यांनी वांशिक भेदभाव संकल्पनेवर मात केली होती. तसेच समतेचा पुरस्कार केला होता. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सकलजनवादी विचारांचे संस्कार केले. यातून सकलजनवादी स्वराज्य साकारले.

जिजाऊंचे व्यक्तिमत्व वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, राजमाता या पलीकडचा विचार स्वीकारणारे होते. जिजाऊंनी निश्चित जीवनमूल्यांचा स्वीकार केलेला होता. उदा. भारतीय स्त्री म्हणून स्त्री मुक्तीचा विचार आणि कार्यक्रम देतात. राजकारणाच्या क्षितिजावर मूल्यसंघर्षाचा एक आदर्श ठेवतात. जिजाऊ आधुनिक समाजाला आणि विचारवंतांना प्रेरणा देणार्‍या ठरल्या (महात्मा फुले, राजाराम शास्त्री भागवत, विठ्ठल रामजी शिंदे). त्यांनी स्वतःच्या सारासार विवेकबुद्धीनुसार समाजाला आकार दिला. त्यांचा विचार मानवकेंद्री होता. हा विचार निसर्ग, राज्य, कुटुंब, समाज, धर्म आणि मानव यांच्यामध्ये समतोल राखतो.

बहुस्तरीय चळवळ : माणूस हाच कर्ता आहे, हे तत्त्व जिजाऊंनी अधोरेखित केले होते. या तत्त्वाच्या चौकटीत त्या आपले जीवन जगल्या. स्वराज्य, स्वभूमी, स्वभाषा ही त्यांच्या जीवनातील त्रिसूत्री होती. स्वधर्म याचा अर्थ कर्तव्य. त्यांनी स्वधर्माबरोबरच स्वराज्याच्या कारभारातून मानवी हक्कांचा दावादेखील केला होता. यामुळे कर्तव्य आणि हक्क या दोन्हींचा संगम त्यांच्या जीवनामध्ये झालेला दिसतो. मानवाच्या अस्तित्वासाठी, कल्याणासाठी संघर्ष हा विचार जिजाऊंच्या जीवनचरित्रातून पुढे येतो. जिजाऊंच्या कालखंडामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक यापैकी एक बाजू घेण्याची परंपरा प्रबळ होती. जिजाऊंनी मात्र या दोन घटकांचा योग्य समन्वय घातला. समाजाला दुष्काळात भौतिक मदत करण्याची गरज होती. तेव्हा त्यांनी पूर्णपणे भौतिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते. थोरल्या दुष्काळाच्या काळात हे स्पष्टपणे दिसते. जिजाऊंनी परिस्थितीला नवा आकार देण्यासाठी कृषी क्षेत्रात बदल करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे कृषीच्या क्षेत्रातील कर्तेपण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य होते.

योजक : जिजाऊंच्या जीवनचरित्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या योजक होत्या. अधिक आर्थिक परिस्थिती समजून घेऊन त्यांनी परिस्थितीला आकार दिला. जिजाऊंनी दैववादी व पितृसत्ताक चौकट नाकारली होती. त्या व्यक्तीला कार्यप्रवण करणार्‍या योजक होत्या. जिजाऊंनी मानवी चैतन्याचा शोध व्यक्तीमध्ये घेतला. त्यांनी व्यक्तीला निष्क्रियतेपासून दूर केले व सक्रिय बनविले. त्यांनी सहकार्याची प्रवृत्ती या गुणाचा विकास केला. ठेविले अनंते तैसेची राहावे तसेच आलिया भोगासी असावे सादर ही जिजाऊंची धारणा नव्हती. निजामशाहीच्या र्‍हासानंतर शहाजीराजे व जिजाऊंच्या जीवनात संकटांचे डोंगर उभे राहिले. तेव्हा दुष्काळ पडलेला होता आणि मानवी जीवन प्रचंड खडतर झाले होते. अशा संकटातही जिजाऊंनी न डगमगता जीवन प्रवास सुरू ठेवला.

मूल्यांचा आग्रह : जिजाऊंनी न्याय, समता, अहिंसा, शांतता अशा मूल्यांचा आग्रह धरला होता. जिजाऊंनी जातीची अन्यायकारक सामाजिक उतरंड नाकारली. स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेत, लष्करात, स्वराज्यात जातीच्या उतरंडीला स्थान दिले नाही. याउलट भक्ती चळवळीकडून आलेली समतेची परंपरा स्वीकारली. न्याय निवाडे करतानाही जिजाऊंनी समता तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी उच्च जातीचे विशेष अधिकार नाकारले. जिजाऊंनी दुर्बल आणि हतबल व्यक्तींना आर्थिक साधने उपलब्ध करून दिली. त्यांनी सामाजिक न्यायासाठी सकारात्मक कृतीचे धोरण राबविले. न्यायनिवाडा करताना सामाजिक न्याय म्हणून आर्थिक दुर्बलांची बाजू घेतली.

सार्वजनिक जीवनातील गुणवत्ता : जिजाऊंनी त्यांच्या काळात राजकारणात, समाजकारणात, प्रशासनात सहभाग घेतला. शिवराय आग्र्‍याला गेले तेव्हा जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार चालविला होता. त्यांनी त्यांच्या जीवनात अनियंत्रित राजकीय सत्ता कधीही स्वीकारली नाही. जिजाऊंनी मानवी जीवनाला प्रगतीच्या मार्गावर आणले. त्यांनी गरजेनुसार अनेक बदलही घडवून आणले. जिजाऊंनी सामाजिक सलोखा, सखा-सखीची संकल्पना, लोक विवेकनिष्ठा अशा संकल्पना व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये राबविल्या होत्या. या अर्थाने जिजाऊंची समग्र जीवनदृष्टी सकलजनवादी होती, असे सुस्पष्टपणे दिसते.

SCROLL FOR NEXT