Latest

सांगली, सातारा जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

backup backup

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर पक्षवाढीसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुखपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश क्षीरसागर १९८६ पासून सक्रिय शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेना अंगीकृत भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख, त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख अशा पदांवर काम करून विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम क्षीरसागर यांनी केले. याच कामाची पोहच पावती म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. या निवडणुकीत कोल्हापूर वासियांनी सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या शिवसैनिकाला आमदार बनविले. यानंतरही विधिमंडळात टोल, एल.बी.टी., रस्ते प्रकल्प, थेट पाईपलाईन, असे सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

राजेश क्षीरसागर यानंतर कोल्हापूर उत्तरचा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर २०१९ मध्ये त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. नुकतीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीमध्येही राजेश क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे.

राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची झालेली संघटनात्मक बांधणीतून शिवसेनेने मोठी मजल मारली आहे. त्याच पद्धतीने सांगली आणि सातारा जिल्ह्यात शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवून शिवसैनिकांची मोट बांधण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी राजेश क्षीरसागर यांच्यावर संपर्कप्रमुख पदाच्या निवडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपविली आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT