Latest

Rajasthan Congress Political Crisis : राजस्थानात गेहलोत विरुद्ध पायलट गटबाजी उफाळण्याची चिन्हे

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Rajasthan Congress Political Crisis : राजस्थानात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमधील अंतर्गतकलह जेमतेम शांत झाला असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, 'आपण खुर्ची सोडण्यास इच्छुक आहे, परंतु मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्याला सोडायला तयार नाही,' असे म्हणत पुन्हा एकदा या सर्वोच्च पदावरील दावेदारी हक्क सूचकपणे पुनरुच्चार केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसमधील गेहलोत विरुद्ध पायलट गटबाजी उफाळण्याची चिन्हे आहेत.

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार यादीवर अंतिम हात फिरविण्याची प्रक्रिया पक्षात सुरू असून पायलट गट आणि गेहलोत गट आपापल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत. यात, पक्षाध्यक्ष खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये उमेदवारांच्या नावावरून गेहलोत यांच्यावर श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती. या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज कॉंग्रेस मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन सारेकाही आलबेल असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला.

गेहलोत म्हणाले,की राजस्थान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झाली आहे. काही मोजक्या ठिकाणी उमेदवारीवर चर्चा सुरू आहे. लवकरच यादी जाहीर करण्यात येईल. सचिन पायलट यांच्याशी काहीही नसल्याचेही गेहलोत यांनी आडवळणाने सांगितले. विरोधक (भाजप) खुप प्रयत्न करूनही आमच्यात भांडणे लावू शकलेले नाहीत. भाजपाला नक्कीच याचे वाईट वाटते आहे. सोबतच, राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचा दावा केला. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबत छेडले असता अशोक गेहलोत यांनी, आपण खुर्ची सोडायला तयार असल्याचा दावा केला. सोबतच, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्याला सोडायला तयार नाहीत अशी सूचक टिप्पणी देखील गेहलोत यांनी केली.

मणिपूरच्या घटनेवरून 'देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांसारख्या संस्था दबावात काम करतात. त्यामुळे या संस्थांची विश्वासार्हता कमी होत आहे. विविध राज्यांमध्ये निवडणुका सुरू असताना तिथे ईडी आधीच पोहोचते. जिथे खरोखर आर्थिक गैरव्यवहार, गुन्हे झालेले आहे तिथे कारवाई झालीच पाहिजे. मात्र विनाकारण कारवाई करणे चुकीचे आहे. राज्यात आचारसंहिता असताना छापे टाकले जात आहेत. या सगळ्या संस्थांमध्ये येणारे अधिकारी हे कुठल्या व्यक्तीसाठी किंवा संघटनेसाठी नाही तर देशाची सेवा करण्यासाठी येतात. असे म्हणत विविध संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या कारवायांकडे लक्ष वेधले.

अजित पवारांची साथ का? – गेहलोत

भाजपने विविध राज्यांमध्ये सरकार बनवण्यासाठी 'फोडा आणि राज्य करा,' ही निती वापरली आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असा टोला मुख्यमंत्री गेहलोत यांनी लगावला. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी झालेल्या हातमिळवणीवरूनही गेहलोत यांनी भाजपला फटकारले. ते म्हणाले,की पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करतात आणि पुढच्या काहीच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी होतो. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांकडेच अर्थ खाते सोपविले जाते,याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपला केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT