Latest

rajasthan election 2023 : राजस्थानात भाकरी फिरणार?

Arun Patil

नवी दिल्ली : राजस्थानातील (rajasthan election 2023) 74 टक्क्यांपेक्षा अधिक मतदानानंतर सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे. 1998 पासून चालत आलेली सत्ता परिवर्तनाची लाट यावेळी थोपवता येईल, असे काँग्रेसला वाटते आहे. तर, सत्तांतराची परंपरा, मोदींचा चेहरा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झालेले ध्रुवीकरण या आधारे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संधी मिळणार असे दावे भाजपच्या गोटातून केले जात आहे.

राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी आज मतदान झाले. उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेसाठीची निवडणूक नंतर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले होते. सत्ताधारी काँग्रेस त्याचप्रमाणे भाजप या दोन्हीही पक्षांमधील अंतर्कलह हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता केंद्रीय नेतृत्व, स्थानिक मुद्दे, विकास योजनांवर प्रचारात भर ठेवला होता. परंतु, हिंदुत्व आणि ध्रुवीकरण हाच मुद्दा खर्‍या अर्थाने केंद्रस्थानी राहिला. यंदा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसले. मात्र राजस्थानातील निवडणुकांचा इतिहास मागील तीन दशकांमध्ये सातत्याने सरकार बदलण्याचा राहिला आहे.

राजस्थानमध्ये सुरुवातीपासून ते 1989 पर्यंत काँग्रेसचे सरकार होते. 1989 मध्ये जनता दल आणि भाजपने मिळून काँग्रेसला पहिल्यांदा सत्तेतून पायउतार केले. परंतु हे सरकार फार काळ टिकू शकले नव्हते. रामजन्मभूमी आंदोलनासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा बिहारमध्ये तत्कालीन जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी अडवली आणि अडवाणींना अटक केली. त्यावरून भाजप आणि जनतादल यांच्यात बिनसल्यामुळे त्याचा फटका राजस्थान सरकारला बसला. भाजपने जनता दल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने 1990 मध्ये राजस्थानमध्ये जनता दल आणि भाजपचे संयुक्त सरकार पडले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. (rajasthan election 2023)

यानंतर 1991 च्या निवडणुकीत भाजप नेते भैरोसिंह शेखावत यांनी जनता दलात फाटाफूट घडवून पक्षाला राज्यात पुन्हा सत्तेत आणले. अर्थात हे सरकारही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नरसिंह राव सरकारने गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या चारही राज्यांमधील भाजपची सरकारे बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली.

भैरोसिंह शेखावत मुख्यमंत्री झाले. हे सरकार पाच वर्षे टिकले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पुनरागमन झाले. 1998 च्या निवडणुकीत हरदेव जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून दर पाच वर्षांनी आलटून पालटून काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्ताबदल होण्याची परंपरा चालतआली आहे. या परंपरेमुळेच काँग्रेसमध्ये सत्ता गमावण्याची साशंकता आहे. तर भाजप याच परंपरेच्या आधारे सत्ता मिळण्याची आस बाळगून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT