Latest

Raj Thackeray : मराठी पाट्यांसाठी मनसे जो संघर्ष केला… कोर्टाच्या निकालानंतर राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मविआ सरकारने गेल्या वर्षी मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले होते. याबाबत व्यापारी संघटनांनी कोरोनाच्या काळातील फटका आणि आर्थिक कारण देत 3 वेळा मुदत वाढवून घेतली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर व्यापारी संघटनांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांनाच फटकारत दुकानांवर 2 महिन्यांत मराठीत नवीन फलक लावा, असे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर एक भली मोठी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. निर्णयाचे स्वागत करत राज ठाकरे म्हणाले, पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला आहे त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

काय आहे नेमकं या पोस्टमध्ये घ्या जाणून ?

"सस्नेह जय महाराष्ट्र

पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे."

"असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत.

आपला नम्र

राज ठाकरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT