Latest

राज्यात मंगळवारपर्यंत पाऊस कायम

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या विविध भागांत मंगळवार (दि. 11) पर्यंत पावसाची हजेरी कायम राहणार आहे. सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात वादळी वारे, मेघगर्जना व विजांचा कडकडाटात पाऊस पडणार आहे. देशाच्या पश्चिमेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच याच भागात चक्रीय स्थितीदेखील कायम आहे. त्यामुळे राज्यात पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत 11ऑक्टोबरपर्यंत, तर मुंबई परिसरात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, नंदुरबारसह विदर्भात तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT