नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा
एकलहरा रोडवर असलेल्या रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याच्या (Railway Traction Factory) आवारात आता रेल्वे चाक निर्मिती आणि दुरुस्तीच्या कारखान्याचा लोकार्पण सोहळा आज (दि. २६) होणार आहे. त्यामुळे येथील 338 कामगारांवरील बदलीची टांगती तलवार आता दूर झाली आहे. उलट कमी कामगार आणि जास्त काम असे चित्र आता निर्माण होणार होत आहे. (Manufacture of Railway Wheel)
तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी नाशिकला रेल्वे इंजिनचा कारखाना मंजूर केला होता. मात्र बदलत्या राजकीय समीकरणामुळे तो कोलकात्याला गेला. त्यानंतर या ठिकाणी रेल्वे इंजिनच्या ट्रॅक्शन मोटारीचे काम सुरू झाले. आता एकलहरे येथे मध्य रेल्वेच्या कर्षण मशीन कारखाना आवारात रेल्वे व्हिल शॉप कारखाना तयार झाला असून सोमवारी (ता.२६) सकाळी दहा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचे उदघाटन करणार आहेत. उदघाटन सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राज्याचे मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थिती राहणार असल्याची माहिती मुख्य कारखाना व्यवस्थापक अलोक शर्मा यांनी दिली.
मनुष्यबळाची मागणी
दरम्यान, नवीन कारखान्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुरेसे मनुष्यबळ द्यावे, त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता सुरु करून कामगारांना न्याय द्यावा, मोटराईज्ड बोगी व कोच मेन्टन्स हे दोन कारखाने सुरु करावेत, अशी मागणी रेल कामगार सेना मंडल उपाध्यक्ष भारत पाटील यांनी केली आहे.
पाच वर्षानंतर प्रकल्प
खासदार हेमंत गोडसे, कामगार युनियनचे भारत पाटील, आनंद गांगुर्डे, पुंजाराम जाधव, पी. ए. पाटील, किरण खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने जानेवारी २०१५ साली दिल्लीत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. तत्कालीन अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते २०१९ ला चाकांच्या कारखान्याचे भूमीपूजन झाले होते. आता पाच वर्षानंतर कारखाना उभा राहिला.
तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी एकलहरेला रेल्वे प्रकल्पांसाठी २५० एकर जागा उपलब्ध करून दिली होती. १६ फेब्रुवारी १९८१ ला २५ एकरात कर्षण कारखाना सुरु झाला. त्यामध्ये रेल्वेच्या मोटारींचे उत्पादन व दुरुस्ती केली जाते. कर्षण कारखाना आवारातच १७ एकरात चाकांचा नवीन कारखाना उभा राहिला आहे. कर्षण कारखान्याची अजूनही ७० एकर जमीन पडिक आहे. तेथे रेल्वे इंजिनची बोगी (चेसी) तयार करणारा कंपलीट मोटराईज्ड बोगी प्रकल्प सुरु करण्यास मंजूरी मिळाली आहे. या चेसीला नाशिक कर्षण कारखान्यातील थ्री पेज ट्रॅक्शन मोटर बसवून मोटराईजन्ड बोगी बाहेर पडणार आहे.
वर्षाला ५०० चाकांची निर्मिती (Manufacture of Railway Wheel)
रेल्वे गाड्यांचा कोच दुरुस्तीचा प्रकल्प एकलहरेत प्रस्तावित आहे. चाकांच्या कारखान्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) ५० कोटी रुपयांची तरतूद केली असून वर्षाला ५०० चाके तयार केली जातील. दोन चाकांच्या सेटची चाचणी झाली आहे. कर्षण कारखान्यात निम्मे मनुष्यबळ असतानाच त्यातील २५ कामगार चाकांच्या कारखान्यात वळते केले आहेत. त्यांना भुसावळच्या कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. भुसावळच्या इंजिन शेडमध्ये असा प्रकल्प कार्यरत आहे. त्यानंतर आता एकलहरे येथे चाकांचा कारखाना सुरु झाला आहे. या चाकांना मोठी मागणी असल्याने आणखी लोकांना रोजगार मिळणार आहे. कर्षण कारखान्यात पूर्वी ६०० कामगार होते. आता ३३८ कामगारच आहेत. कमी कर्मचाऱ्यांमध्ये दुपटीने उत्पादन घेतले जात असल्याने रेल्वेने प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी युनियने केली आहे.
देशातील सर्वच रेल्वे कारखान्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र, कर्षण कारखाना स्थापनेपासून हा भत्ता दिला जात नाही. दोन्ही कारखान्यात मनुष्यबळ देण्याची मागणी रेले कामगार सेनेचे नेते भारत पाटील, सुभाष सोनवणे, संदीप नगरे, किरण खैरनार, सचिन धोंगडे, सी. डी. बोरसे, अक्षय़ गायकवाड, ओंकार भोर, ज्ञानेश्वर निसाळ, सचिन चौधरी, जय आतीलकर, मंगेश सायखडे, लहू खलाने आदींनी केली आहे.