Latest

चला पर्यटनाला : रायगड जिल्ह्यातील 40 किल्ले पर्यटकांचे आकर्षण!

दिनेश चोरगे

अलिबाग; जयंत धुळप : ऐतिहासिक, धार्मिक स्थळांसोबत नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेल्या रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांमध्ये गेल्या तीस वषार्र्ंत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा किल्ले रायगड जिल्हा केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील इतिहास अभ्यासक आणि पर्यंटकांकरिता मोठे आकषर्र्ण आहे. रायगड किल्ल्यामुळेच या जिल्ह्यातील अन्य एकूण 40 लहान-मोठे किल्ले हे गडप्रेमींचे आकर्षण ठरले आहेत. प्रत्येक गडाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत न्याहारी-निवास व्यवस्था तयार झाल्याने पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील निवडक किल्ल्यांचा घेतलेला वेध…

रायगड किल्ला : रायगड हा किल्ला महाड या ठिकाणापासून सुमारे 25 कि.मी. अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. सध्या किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा आहे. गेल्या दोन वर्षांपासून रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे गडावर करण्यात येत आहेत.

किल्ल्यावर गंगासागर तलाव आहे. चालत जाण्यासाठी एकमेव मार्ग महा-दरवाजामधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून, ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला हिरकणी बुरूज प्रसिद्ध आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात निवास आणि भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

कसे जाल? ः मुंबई – गोवा महामार्गावरील महाड येथून 24 कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे.
मुरुड-जंजिरा किल्ला : मुरुड-जंजिरा जलदुर्ग मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याच्या बुरुजावर युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पाहावयास मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावर पुरातन काळातील महाल, दराबारीसाठी खोल्या, मशीद, दोन छोटी गोड्या पाण्याची तळी आहेत. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल येथे आहे. 'कालालबंगडी', 'चावरी', 'लांडा कासम' या तीन तोफा किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत.

कसे जाल? ः पुणे येथून ताम्हीणी घाटमार्गे कोलाड-रोहामार्गे मुरुडला पोहोचता येते. मुंबईहून अलिबाग- रेवदंडा मार्गे मुरुडला जाता येते. मात्र, सद्यस्थितीत रेवदंडा येथील साळाव खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक बंद आहे. परिणामी, मुंबईकडून येणार्‍या पर्यटकांना नोगोठणे-रोहा-साऴाव मार्गेच मुरुडला जावे लागते.

कुलाबा किल्ला : अलिबाग समोरच्या अरबी समुद्रातील कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला अलिबाग शहरानजीक आहे. जलदुर्ग असूनही किल्ल्यावर असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवर अनेक हल्ले चढवले आणि त्यांना नामोहरम केले होते. समुद्र ओहोटीच्यावेळी या किल्ल्यात चालतदेखील जाता येते. अलिबाग व परिसरात राहण्याची व्यवस्थादेखील कॉटेज व हॉटेलमध्ये आहे.

कसे जाल? ः मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने मांडवा व पुढे अलिबागला पोहोचून किल्ल्यात जाता येते. पुण्याकडून खोपोली-पेणमार्गे अलिबागला पोहोचता येते. अलिबागला येण्याकरिता एस.टी.च्या बसदेखील सतत उपलब्ध आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT