Latest

Rahul Gandhi : राहुल गांधींनी सुरू केली ‘२०२४’ ची तयारी; देशभरात काढणार ‘भारत जोडो यात्रा’

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्ष 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे केंद्रातील मोदी सरकारविरोधात अभियान सुरू करण्याच्या योजनेवर रणनीती आखत आहेत. त्यानुसार ते 22 ऑगस्ट रोजी विविध संघटनांच्या आणि व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार आहेत.

2014 मध्ये मनमोहन सिंग सरकारविरोधात जी पद्धत भाजपने वापरली होती, तशाच रणनीतीवर राहुल काम करत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू करणार आहेत. त्यापूर्वी समाजातील विविध संघटनांशी, विविध वर्गांसाठी काम करत असलेल्या लोकांशी ते चर्चा करणार आहेत. याचाच भाग म्हणून ते योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांचीही भेट घेणार आहेत. 22 ऑगस्ट रोजी होणार्‍या या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.

2014 च्या निवडणुकीपूर्वी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या बॅनरखाली अनेक संघटनांनी सिंग सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली होती. भ्रष्टाचार आणि धोरण लकवा हे मुद्दे भाजपने उपस्थित केले होते. तेव्हा अखिल भारतीय आंदोलनाचे स्वरूप त्याला प्राप्त झाले होते आणि दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा निवडणुकीत पराभव झाला होता. याच धर्तीवर राहुल गांधीही आता अनेकांना भेटून संवैधानिक संस्थांचा दुरूपयोग, बेरोजगारी, समाजातील दुही, शेतकर्‍यांचे प्रश्न, अर्थव्यवस्थेची स्थिती याबाबतचे मुद्दे उपस्थित करणार आहेत. भारत जोडो यात्रेसाठी स्वतंत्र लोगो, स्वतंत्र संकेतस्थळ आणि साहित्यही तयार केले गेले आहे.

SCROLL FOR NEXT