Latest

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी तयार

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेला सहमती दर्शवली आहे. राहुल गांधींनी माजी न्यायाधीश मदन लोकूर, माजी न्यायाधीश अजित शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांना पत्र लिहून आपली संमती पाठवली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "पंतप्रधान मोदींसोबत मुद्द्यावर आधारित चर्चेबाबत तुम्ही तुमच्या पत्रात जे काही लिहीले आहे त्यासाठी मी तयार आहे. यामुळे लोकांना आमची विकासाच्या दृष्टीबद्दल कळू शकेल. निवडणूक लढवणाऱ्या पक्षांचे व्हिजन थेट जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. जेव्हा पंतप्रधान परवानगी देतील तेव्हा आम्ही चर्चेच्या स्वरूपाचा विचार करू." असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी माजी न्यायाधीश मदन लोकूर, माजी न्यायाधीश अजित शाह शाह आणि पत्रकार एन. राम यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सार्वजनिक चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की "जनता चिंतेत आहे कारण, दोन्ही बाजूंनी (एनडीए आणि इंडिया) केवळ आरोप आणि आव्हाने दिली गेली आहेत.

कोणतेही साधक-बाधक उत्तर मिळालेले नाही. तसेच सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्याने सबंध जगाचे आपल्या देशातील निवडणुकांवर लक्ष आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षविरहित व्यासपीठांवर चर्चा करायला हवी." दरम्यान, या पत्राला राहुल गांधी यांनी उत्तर देत चर्चेला होकार कळवला आहे.

SCROLL FOR NEXT