Latest

Rahul Gandhi | धुळ्यात राहुल गांधीचा होणार रोड-शो, अभूतपूर्व तयारी सुरु; दिल्लीत पडसाद उमटविण्याचा निर्धार

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यात खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अभूतपूर्व असे स्वागत करणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज झालेल्या बैठकीत केला. दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून जिल्हयात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात खा. राहूल गांधी यांचे स्वागत केले जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान धुळे जिल्ह्याचे भारत जोडो न्याय यात्रेचे पडसाद दिल्लीत उमटले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना (उबाठा) नेते माजी आ.अशोक धात्रक यांनी बैठकित केले.

भारत जोडो न्याय यात्रेचे अभूतपूर्व असे स्वागत करणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज झालेल्या बैठकीत केला

खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दि. 12 मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचे धुळे जिल्हयात आगमन होत आहे. तर बुधवार दि. 13 मार्च रोजी धुळे शहरात या यात्रेचे आगमन होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागतासाठी व नियोजनासाठी आज शनिवार दि.9 मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना(उबाठा) नेते माजी आ.अशोक धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष व संघटनांची बैठक धुळ्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकित भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या ठिकाणी करणार जंगी स्वागत

सोनगीर ता.धुळेपासून तर देवभाने, सरवड, नगाव, नगाव बारी, देवपूर, मा.गांधी पुतळा, कराचीवाला खुंट, पाच कंदिल, छ.शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीज यांसह विविध चौकात स्वागताची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. या ठिकाणांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), शिवसेना(उबाठा), तसेच इतर समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. तर छ.शिवाजी महाराज मनोहर टॉकीजजवळ खा.राहूल गांधी यांच्या चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खा.राहूल गांधी यांचा दोंडाईचापासून ते धुळ्यापर्यंत रोड शो होणार आहे. बैठकित आ.कुणाल पाटील, शिवसेना(उबाठा) नेते माजी आ.अशोक धात्रक,काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, ज्येष्ठ पत्रकर हेमंत मदाणे, डॉ.अनिल भामरे, महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित भोसले, ज्येष्ठ नेते साबीर खान, हरिश्‍चंद्र लोंढे, शिवसेनेचे हेमंतभाऊ साळंखे यांनी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

बैठकिचे सुत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी केले तर आभार प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस युवराज करनकाळ यांनी मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT