Latest

Radar सैन्य उपकरणांना रडारपासून लपवणारी नवी पद्धत विकसित

Arun Patil

नवी दिल्ली : संरक्षण तसेच नागरी क्षेत्रांमध्ये रडारचा वापर विमान, जहाज, वाहने किंवा गुप्त ठिकाणांची निगराणी, शोध, नेव्हिगेशन व ट्रॅकिंगसाठी केला जात असतो. सैन्य उपकरणांना रडारच्या नजरेपासून लपवून ठेवणे ही एक महत्त्वपूर्ण संरक्षण रणनीती असते. आता आयआयटी मंडीमधील संशोधकांनी एक अशी कृत्रिम संरचना किंवा सामग्री तयार केली आहे जी स्टेल्थ वाहने आणि गुप्त ठिकाणांना रडारच्या नजरेपासून अद़ृश्य ठेवण्यासाठी मदत करते. कोणत्याही दिशेने रडार संकेतांनी लक्ष्याला 'हिट' केले तरी ही सामग्री रडार संकेतांना शोषून घेऊ शकते.

या क्षमतेचा वापर स्टेल्थ वाहने आणि महत्त्वपूर्ण इमारतींच्या खिडक्या किंवा काचेचे पॅनेल्सना आच्छादित करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे रडारच्या नजरेपासून ते लपून राहू शकतात. या क्षमतेचा वापर वाणिज्यीक क्षेत्रात इमारतींना विकिरणांच्या धोक्यापासून संरक्षण देणे आणि त्यांना अधिक सुरक्षित बनवण्यासाठी होऊ शकतो.

रडारच्या नजरेतून अद़ृश्य बनून राहण्यासाठीचे हे तंत्रज्ञान संवेदनशील खासगी किंवा गुप्त ठिकाणांमध्येही होऊ शकतो. रडारपासून लपून राहण्याची क्षमता असलेल्या स्टेल्थ तंत्रज्ञानात रडार क्रॉस सेक्शन (आरसीएस) ला कमी करण्याचे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या मूलभूत तंत्रात ऑब्जेक्टला योग्य आकार देणे आणि रडार अवशोषक सामग्रीचा वापर केला जातो. 'आरसीएस'मधील कपात अशा सामग्रीला उपयोगात आणून मिळवली जाऊ शकते जी रडार सिग्नल्सना शोषून घेते.

ऑब्जेक्टस्ना विशिष्ट आकार देऊनही 'आरसीएस' कमी केली जाऊ शकते. त्यामुळे रडारसाठी संंबंधित वस्तू शोधणे कठीण जाते. आयआयटी मंडीमधील संशोधक डॉ. जी. श्रीकांत रेड्डी यांनी सांगितले, आम्ही फ्रीक्वेन्सी सिलेक्टिव्ह सरफेस (एफएसएस) वर आधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे जे रडारमध्ये वापरण्यात येणार्‍या आवृत्तींच्या विस्तृत श्रुंखला शोषून घेऊ शकते. त्यामुळे ऑब्जेक्टचा पृष्ठभाग रडारसाठी अद़ृश्य राहतो. चाचण्यांमधून असे दिसले आहे की एफएसएस तंत्र 90 टक्क्यांहून अधिक लहरींना आवृत्तींच्या एका विस्तृत श्रृंखलेत शोषून घेऊ शकते.

SCROLL FOR NEXT