Latest

R Aswin Record : डब्ल्यूटीसीमध्ये अश्विनचा मोठा पराक्रम! ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. पण आर अश्विनने ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाहुण्या संघाच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. आर अश्विनने पहिल्या डावात 3 विकेट घेऊन मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. तो आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.

भारतासाठी 'अशी' कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला (R Ashwin Record)

हैदराबाद कसोटीपूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात रविचंद्रन अश्विनच्या नावावर 148 विकेट्स होत्या. पण हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने इंग्लंडच्या बेन ड्युकेटला एलबीडब्ल्यू आऊट करून भारतीय संघाला पहिले यशही मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने जॅक क्रॉली आणि चहापानानंतर अश्विनने मार्क वुडला क्लिन बोल्ड करून डब्ल्यूटीसीच्या इतिहासात 151 विकेटचा टप्पा गाठला.

अश्विनने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 31 सामने खेळले आहेत आणि 26.06 च्या सरासरीने 151 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत पॅट कमिन्स (40 सामने) आणि नॅथन लायन (41) पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी दोघांनी 169-169 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या इतिहासात दीडशेहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी करणारा अश्विन हा भारतीय संघातील पहिला खेळाडू ठरला आहे. अश्विननंतर भारतासाठी डब्ल्यूटीसीच्या इतिहासात दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याने आतापर्यंत 91 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विन 500 बळींच्या उंबरठ्यावर (R Ashwin Record)

कसोटीमध्ये अश्विनच्या खात्यात आतापर्यंत 492 विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याला 500 बळी पूर्ण करण्यासाठी केवळ 8 फलंदाजांना बाद करावे लागणार आहे. सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या 8व्या स्थानावर आहे आणि एकदा त्याने 500 बळींचा टप्पा ओलांडला की, असे करणारा तो जागतिक क्रिकेटमधील आठवा आणि चौथा फिरकी गोलंदाज बनेल.

SCROLL FOR NEXT