लंडन : एलियन म्हणजेच परग्रहवासीयांच्या शोधासाठी पृथ्वीवरून वैज्ञानिक अनेक प्रकारचे सिग्नल्स अंतराळात पाठवत राहतात. तसेच अंतराळातही विशेष सिग्नल्सचा शोध घेतला जात असतो. मात्र, एलियन्सच्या शोधासाठी ज्या सिग्नल्सचा वापर केला जात होता ते पारंपरिकच आहेत. संशोधकांना वाटते की कदाचित एलियन्सनी अतिशय मोठी वैज्ञानिक प्रगती केलेली असावी आणि त्यामुळे ते अन्य प्रकारच्या सिग्नल टेक्निकचा वापर करीत असतील. त्यामुळे आता त्यांच्याशी संपर्क होण्यासाठी क्वांटम सिग्नलचा वापर केला जाणार आहे.
थ्योरेटिकल फिजिक्सचे वैज्ञानिक अर्जुन बेरेरा यांनी म्हटले आहे की एलियन्स संस्कृतीने (जर असेलच तर) संवादासाठी अधिक प्रगत मार्ग शोधले असतील. त्यामुळे ज्या सिग्नल्सचा आपण वापर करीत आहोत तेच तेही वापरत असतील असे नाही. आपल्याला क्वांटम द़ृष्टिकोणाबरोबर संकेतांचा शोध घेतला पाहिजे.
सध्या पृथ्वीवरही कम्युनिकेशनच्या स्तराचा विकास झाला आहे. पन्नास वर्षांपूर्वी ज्याचा वापर होत होता त्या आता राहिलेल्या नाहीत. नव्या काळात क्वांटम कम्युनिकेशनचा वापर होईल. क्वांटम कम्युनिकेशन चॅनेलमधून मेसेज पाठवण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की त्याच्या माध्यमातून आपण अतिशय मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित करू शकतो.
क्लासिकल पद्धतीने बिटस्च्या रूपात माहिती पाठवण्याऐवजी क्यूबिटमध्ये पाठवली जाऊ शकते. बिटस्मध्ये कोणत्याही संकेताचे प्रमाण केवळ शून्य आणि एक असते. मात्र, क्यूबिटमध्ये या दोन्हींसमवेत क्वांटम सुपरपोझिशनही असते. सोप्या भाषेत सांगायचे तर क्वांटम माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेटा छोट्या ट्रान्समिशनमधूनही जाऊ शकतो. या माध्यमातून आपण 'मिल्की वे' या आपल्या आकाशगंगेच्याही बाहेर सिग्नल पाठवू शकतो.